Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये घडवला नालासोपारा बॉम्बचा स्फोट 

कल्याणमध्ये घडवला नालासोपारा बॉम्बचा स्फोट 

Published On: Aug 29 2018 2:00AM | Last Updated: Aug 29 2018 2:00AMमुंबई : प्रतिनिधी

पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलसोबतच ‘पद्मावत’ या चित्रपटावेळी कल्याण आणि कर्नाटकमधील चित्रपटगृहाबाहेर बॉम्बस्फोट करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. यापैकी पद्मावत सिनेमावेळी कल्याणच्या भानुदास चित्रपटगृहाबाहेर स्फोटसुद्धा घडवून आणला गेल्याची धक्‍कादायक माहिती नालासोपारा स्फोटकांप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केेलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर यांच्या चौकशीतून समोर आली आहे. 

या आरोपींच्या टार्गेटवर असलेल्या विचारवंतांच्या नावांची एक यादीच सापडली असून, ही माहिती एटीएसने मंगळवारी सत्र न्यायालयात दिली. याच माहितीच्या आधारे गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने चारही आरोपींच्या कोठडीमध्ये सात दिवसांची वाढ केली आहे.

राऊत, कळसकर, गोंधळेकर आणि पांगारकर यांच्या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे चौघांनाही एटीएसने वाढीव कोठडीसाठी मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी एटीएसच्या वतीने सरकारी वकिलांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती दिली. यात चारही आरोपींचा टार्गेटवर असलेल्या ठिकाणांच्या रेकीमध्ये सहभाग आहे.

या आरोपींजवळ टार्गेटवर असलेल्या विचारवंतांच्या नावाची एक यादीच सापडली असून, स्फोटके बनविणे, शस्त्र चालविणे यासाठी त्यांनी सात ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे उघड  झाले आहे. राज्यातील औरंगाबाद आणि जालन्यात असलेल्या दोन प्रशिक्षण केंद्रांसह परराज्यांतील पाच प्रशिक्षण केंद्रांचा आतापर्यंत उलगडा झाला आहे. आणखी दोन प्रशिक्षण केंद्रांबाबत आरोपींकडून माहिती घेण्यात येत आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर आरोपींनी पद्मावत सिनेमाच्या प्रसारणावेळी कल्याणमधील भानुसागर चित्रपटगृहाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला. याच चित्रपटावेळी कर्नाटकच्या बेळगावमधील प्रकाश थिएटरबाहेर आणि पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलच्या वेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा आरोपींचा प्रयत्न तपासात समोर आला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

आरोपींजवळ सापडलेली स्फोटके, स्फोटकांचे साहित्य, शस्त्रसाठा आणि साहित्य हे सर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधून खरेदी करण्यात आल्याचे तपासात समोर आले असून, हा पुरवठा करणार्‍यांचा, तसेच या गुन्ह्याच्या मागच्या मास्टरमाईंडचा शोध सुरू आहे. आरोपींनी काही गुन्ह्यांत वापरलेल्या शस्त्रांचे पार्ट वेगळे करून ते नष्ट केल्याचा दाट संशय असून, याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज, आरोपींजवळून ताब्यात घेतलेले मोबाईल, कॉम्प्युटर, सीपीयू, हार्डडिस्क, लॅपटॉप, पेनड्राईव्ह अशातून तब्बल 10 हजार गीगाबाईट (जीबी) डाटा सापडला असून, त्याची तपासणी सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक रसद आणि मदत पुरविणार्‍या पांगारकरकडे चौकशीसाठी फक्‍त दहा दिवस मिळाले असून, तो अन्य आरोपींसोबत रेकी करण्यात सहभागी होता. त्याच्याजवळून 3 मोबाईल, एक कॅमेरा, हार्डडिस्क, कार आणि बँक खात्यांबाबतची कागदपत्रे, दस्तऐवज जप्‍त करण्यात आला आहे. पांगारकरकडे काही छायाचित्रेही सापडली आहेत. याबाबत तपास सुरू असून, पुढील तपासासाठी चौघांच्याही कोठडीत सात दिवसांची मुदतवाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. याला आरोपींचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी विरोध केला.एटीएसने आरोपींकडून सर्व दस्तऐवज गोळा केला आहे. यातील डाटा ते आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही तपासू शकतात. आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना मास्टरमाईंड, ठोस हेतू सापडला नाही, असा युक्‍तिवाद करत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी अ‍ॅड. पुनाळेकर यांनी केली. मात्र, न्यायालयाने सरकारी पक्षाची मागणी मान्य करत आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये 3 तारखेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. यावेळी आरोपी वैभव राऊतच्या लहान मुलीसह आरोपींचे नातेवाईक न्यायालयात आले होेते. त्यांना सुनावणीवेळी हजर राहण्याची, तसेच आरोपींना भेटण्याची परवानगी त्यांच्या वकिलांनी केलेल्या मागणीनंतर न्यायालयाकडून देण्यात आली.