होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

वडिलांच्या हत्येचा घेतला बदला

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:34AMनालासोपारा : वार्ताहर

वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलाने हत्यार्‍याची हत्या करून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा येथे राहणारे मंगेश यादव यांची 2014 साली हत्या झाली होती. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी इस्टेट एजंट प्रवीण दिवेकर याला अटक केली होती. त्यावेळी मृत यादव यांचा मुलगा विशालने वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली होती. एक वर्षापूर्वीच दिवेकर जामिनावर सुटला होता. शुक्रवारी दुपारी दिवेकर नालासोपारा पश्चिमेच्या फनफिएस्टा येथून जात असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याच्यावर चॉपर आणि चाकूने वार केले

यानंतर त्याला उपचारासाठी नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दररोज दुपारी दिवेकर आपल्या मुलीला शाळेतून घ्यायला जात असे. शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास तो मुलीला शाळेतून आणण्यासाठी जात असताना दबा धरून बसलेल्या विशाल आणि त्याच्या साथीदाराने हा हल्ला केला. नोव्हेंबर महिन्यात दिवेकर जामिनावर सुटून आला होता. त्यावेळी आरोपी विशालने आपल्या अन्य दोन मित्रांसह दिवेकर याच्यावर कुर्‍हाडीने वार केले होते. त्यावेळी दिवेकर थोडक्यात बचावला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या दुसर्‍या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
 

 

tags ; Nalasopara,news, Revenge , assassination,father, murder, Nalasopara, case,