होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अत्याचारापासून बचावण्यासाठी मुलीने टाकली इमारतीवरून उडी

अत्याचारापासून बचावण्यासाठी मुलीने टाकली इमारतीवरून उडी

Published On: Apr 07 2018 2:11AM | Last Updated: Apr 07 2018 2:08AMनालासोपारा : वार्ताहर 

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्‍तीने 12 वर्षीय मुलीला थांबवून जबरदस्तीने गच्चीवर नेले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी मुलीने तीन मजली इमारतीवरून उडी घेतल्याची घटना नालसोपारा पूर्वेकडील अलकापुरी येथे बुधवारी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत आहे. मुलगी इमारतीवरून उडी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी तुळींज पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नालासोपारामधील अलकापुरी येथे राहणारी 12 वर्षांची  मुलगी मंगळवारी आर. के. महाविद्यालयाजवळील एका इमारतीत साहित्य घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्‍तीने तिला बळजबरीने इमारतीच्या गच्चीवर   नेले. त्याने तिथे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे भेदरलेल्या मुलीने मदतीसाठी धावा केला आणि थोड्या वेळाने बचावासाठी थेट गच्चीवरून उडी मारली. ती उडी मारत असताना खाली असलेल्या गॅरेज चालकांनी रिक्षाचा रबरी छत (हुड) पसरून तिला झेलण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तरी ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या कंबरेचे हाड मोडले आहेे. दोन दिवसांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया कऱण्यात आली. सध्या या मुलीची प्रकृती चांगली आहे. डिस्चार्ज देण्याबद्दल ऑर्थोपेडिक विभागाचे डॉक्टर निर्णय घेतील त्यानुसार लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरण, पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घडली त्या परिसरात अनेक निवासी इमारती आहेत. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांनी दिली. दरम्यान, एका अनोळखी व्यक्‍तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवले आणि जबरदस्तीने गच्चीवर नेले, अशी फिर्याद मुलीने दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले. पण, उडी मारण्यापूर्वी ती मुलगी पाच मिनिट गच्चीवर पाय सोडून बसली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. तिने उडी का मारली किंवा तो अनोखळी व्यक्‍ती कोण होता त्याचा शोध पोलीस घेत आहेत.