Sat, Jul 20, 2019 11:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान; तिघांवर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:25AMनालासोपारा : वार्ताहर 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात स्थानिक पत्रकारासह दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  गेल्या आठवड्यात नालासोपारा येथील रणदीप पांडे या तरुणाने फेसबुकवर डॉ. बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने त्याला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी डॉ. आंबेडकरांची फेसबुकवर बदनामी केल्याचे आणखी एक प्रकरण उजेडात आले.

संजय मिश्रा या नालासोपारा येथील पत्रकाराने डॉ. आंबेडकरांचे आक्षेपार्ह छायाचित्र फेसबुकवर टाकले होते. त्यावर पंडीत त्रिपाठी आणि किशन या दोघांनी आक्षेपार्ह आणि जातीवाचक उद‍्गार काढणार्‍या पोस्ट केल्या होत्या.  याप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे पालघर जिल्हाध्यक्ष सुधीर सोनावणे यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा करून या तिघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत गुन्हा  दाखल करण्यात आला.  आठवडाभरातील ही दुसरी घटना असून हेतुपुरस्सर डॉ. आंबेडकरांची बदनामी केली जात असल्याचे तक्रारदार सोनावणे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाणे अंमलदाराशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला माहिती नसल्याचे सांगितले.
 

 

 

tags ; Nalasopara,news,Dr,Babasaheb, Ambedkar's, infamy ,Three,offense,