Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाईक गँगचा शार्पशूटर डोंबिवलीत जेरबंद

नाईक गँगचा शार्पशूटर डोंबिवलीत जेरबंद

Published On: May 25 2018 1:22AM | Last Updated: May 25 2018 12:52AMडोंबिवली : वार्ताहर

अनेक खून, खंडणी, रॉबरी, घरफोड्या करून पोलीस खात्याला घाम फोडणार्‍या कुख्यात गँगस्टर अश्विन नाईक याच्या गँगचा धर्मराज चंदू शेडगे या 50 वर्षीय शार्पशूटरला डोंबिवली पोलिसांनी मोठ्या धाडसाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. डझनभर गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या या शूटरला नाशिक क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डोंबिवलीच्या पूर्वेकडील चंद्रकांत पाटकर शाळेजवळ अश्विन नाईक गँगचा शूटर येणार असल्याची माहिती डोंबिवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी संध्याकाळ 5 वाजल्यापासून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अजय किर्दत, सचिन वानखेडे, चंद्रकांत शिंदे, हेमंत राणे, ऋषिकेश भालेराव या पथकाने परिसरात जाळे पसरले. 6 वाजून 20 मिनिटांनी शाळेच्या परिसरातील रस्त्याला फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे अचानक प्रकटलेल्या या गँगस्टरने सर्वत्र पाहणी केली. 

यावेळी पोलिसांनी लावलेल्या फिल्डिंगची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढला. मात्र फिल्डिंग लावलेल्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून काही अंतरावर या गँगस्टरची गठडी वळली. अंगझडतीत त्याच्याकडे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू वा शस्त्र आढळून आले नाही. हा गँगस्टर त्याच्या एका साथीदाराला भेटण्यासाठी डोंबिवलीत शिरल्याची माहिती चौकशीदरम्यान बाहेर आली. दरम्यान कसून चौकशी केल्यानंतर धर्मराजचा बुरखा डोंबिवलीच्या पोलिसांनी फाडला. त्यामुळे धर्मराज याने आपल्यावर असलेले गुन्हे आणि न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांचा पाढाच वाचला.

कोण आहे हा शार्पशूटर धर्मराज?

अकराव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेल्या धर्मराजने आपण इस्टेट एजंट असल्याची माहिती दिली असली तरी त्याच माध्यमातून 5-6 महिन्यांपूर्वी दिव्यात घुसखोरी करून तेथील बिल्डरांना घाम फोडला आहे. खंडणीसाठी भगत नावाच्या बिल्डरची झोप उडवून मुंब्रा पोलिसांना कामाला लावले. नाशिक रोडला जगताप मळ्यातील जय दुर्गा सोसायटीत सभ्य गृहस्थ म्हणून वास्तव्य करणारा धर्मराज हा सध्या बदलापूर पश्चिमेतील दत्त चौकात असलेल्या चामुंडा विहार सोसायटीच्या तळमजल्यावर राहत असल्याचे सांगतो. त्याच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्यात खुनाचे 2 गुन्हे दाखल आहेत. तर घरफोड्यांच्या गुन्ह्यांची मालिका असलेला हाच शूटर धर्मराज जामिनावर मुक्त आहे. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात 4 साथीदारांसह त्याच्या विरोधात सशस्त्र लुटीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला धर्मराज याला नाशिक क्राईम ब्रँच जंग जंग पछाडत होती. तेव्हापासून धर्मराज पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र त्याला बेड्या ठोकणार्‍या डोंबिवली पोलिसांचे नाशिक पोलिसांनी कौतुक केले आहेत.