Tue, Jul 23, 2019 06:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नायगाव, चेंबूर मतदारसंघ भाजप राणेंसाठी सोडणार?

नायगाव, चेंबूर मतदारसंघ भाजप राणेंसाठी सोडणार?

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:49AMमुंबई : राजेश सावंत

भाजपा व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणूकीत कोकणातील काही विधानसभा मतदार संघासह मुंबईतील नायगाव व चेंबूर मतदार संघ राणेंच्या स्वाभिमान पक्षाला देण्याचा विचार भाजपाचा आहे. यावर मुंबई व महाराष्ट्रातील नेत्यांचे एकमत झाले असून याबाबतचा प्रस्ताव भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे समजते.

काँग्रेस सोडून नारायण राणे भाजपात जाणार हे जवळजवळ निश्‍चित झाले होते. पण राणेंचा रोखठोक स्वभाव भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारा नसल्यामुळे स्वत: अमित शहा यांनी राणेंना स्वतंत्र पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राणेंनी स्वाभिमानी पक्षाची घोषणा करत, भाजपाला पाठिंबा दिला. याची परतफेड म्हणून भाजपाने राणेंना राज्य सभेच्या खासदार पदी बसवले. महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणायची असेल तर राणेंना जवळ करणे हे भाजपाच्या फायद्याचे आहे. एवढेच नाही तर, कोकण व मुंबईतील काही भागात शिवसेनेला शह देण्यासाठी राणे अस्त्रच योग्य असल्याचे भाजपाने हेरले आहे.

त्यामुळे राणेंच्या स्वाभिमानी पक्षाला सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील वैभववाडी-देवगड-कणकवली व मालवण-कुडाळसह अन्य दोन विधानसभा मतदार संघ सोडले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतही राणेंचे नायगाव व चेंबूर विभागात वर्चस्व आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने 15 जागा जिंकल्या होत्या. यात अजून पाच ते सात जागांनी वाढ करण्यासाठी मुंबई भाजपा प्रयत्नशील आहे. यासाठी स्वत: मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांची चाचपणी सुरू असल्याचे समजते. 2019 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मुंबईत किमान 20 ते 22 आमदार निवडून आणण्यासाठी शेलार यांनी आतापासूनच सज्ज राहण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहेत.

नायगाव विधानसभा मतदार संघात राणे समर्थक काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचा प्रभाव आहे. नरेंद्र मोदी लाटेतही कोळंबकर निवडून आले होते. त्याशिवाय चेंबूर मतदार संघात राणेंना मानणारे काही मतदार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात स्वाभिमान पक्षाशी युती करून त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर भाजपात एकमत झाले आहे. नायगावमधून पुन्हा कालिदास कोळबकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे कोळंबकर यांना स्वाभिमान पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपाची ताकद पणाला लावून त्यांना निवडून आणण्याची भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे.