Tue, Jul 16, 2019 22:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नागपूर अधिवेशन तीन आठवडे, कामकाज मात्र तेरा दिवसांचे!

नागपूर अधिवेशन तीन आठवडे, कामकाज मात्र तेरा दिवसांचे!

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:43AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

येत्या 4 जुलैपासून नागपूर येथे सुरू होणारे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपर्यंत चालणार आहे. या तीन आठवडे आणि 17 दिवसांच्या अधिवेशनात कामकाजात चार सुट्ट्या असल्याने हे अधिवेशन 13 दिवस चालणार आहे. या अधिवेशनात नवीन 9 आणि प्रलंबित 10 विधेयके मांडली जाणार आहेत.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनातील कामकाज ठरविण्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानुसार 4 ते 20 जुलैपर्यंत अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे. एकूण 17 दिवसाच्या कामकाजात चार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 

पहिल्या दिवशी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे शोकप्रस्ताव मांडण्यात येईल. अधिवेशनात नवीन 9 आणि प्रलंबित 10 अशी एकूण 19 विधेयके मांडली जाणार आहेत. विधान परिषदेतील 11 सदस्यांची मुदत संपत असल्याने विधान परिषदेच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी या सदस्यांना निरोपही दिला जाणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे रामराजे नाईक — निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार, विधानसभेतील गटनेते जयंत पाटील, शेकापचे गटनेते गणपतराव देशमुख आदी उपस्थित होते. 

नागपूर येथे सुरू होणारे हे पावसाळी तिसरे पावसाळी अधिवेशन ठरणार आहे. यापूर्वी 1961 साली 14 जुलै ते  30 ऑगस्ट दरम्यान तर दुसरे पावसाळी अधिवेशन 1966 साली 29 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत पार पडले होते.