Wed, Jul 17, 2019 20:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नईम खानच्या एके 56 रायफलची  फॉरेन्सिक लॅबला होणार तपासणी

नईम खानच्या एके 56 रायफलची  फॉरेन्सिक लॅबला होणार तपासणी

Published On: Jul 13 2018 1:24AM | Last Updated: Jul 13 2018 1:02AMठाणे : प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगचा कुख्यात शार्प शूटर नईम फईम खान याच्या मुंबईतील बांगुर नगरमधील घरातून एके 56 रायफल, 3 मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 2 नाईन एमएम पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने मागील आठवड्यात हस्तगत केला होता. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या रायफलचा कुठे उपयोग करण्यात आला होता का, याची पडताळणी करण्यासाठी एके 56 रायफल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या सूत्रांनी दिली.

ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईच्या बांगुरनगर मधून हस्तगत केलेली एके 56 रायफल ही चायनामेड असून ती 1993 च्या बॉम्ब स्फोटानंतर भारतात आणली गेली असावी असा पोलिसांना संशय आहे. बाबरी मस्जिद पाडल्या नंतर मुंबईत उसळलेल्या दंगलीवेळी दाऊदने आयएसआयच्या मदतीने मोठा शस्त्रसाठा भारतात पाठवला होता. त्यापैकीच ही एक रायफल असावी असे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. ही रायफल गंजलेल्या अवस्थेत असली तरी तिचा उपयोग होऊ शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, नईम याने एके 56 रायफल आणि इतर शस्त्रसाठा कोठून मिळवला? तो या शस्त्रसाठ्याचा कुठे उपयोग करणार होता? याचा तपास ठाणे पोलीस करीत असून या तपासासाठी नईम खानला पोलीस कास्टडीत घेणार असल्याची माहिती प्रदीप शर्मा यांनी दिली. 

नईमची पोलीस कस्टडी मिळावी म्हणून ठाणे पोलिसांनी कोर्टात धाव घेतली आहे. तसेच या रायफलचा कुठे उपयोग करण्यात आला होता का? याची पडताळणी करण्यासाठी सदर रायफल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या सूत्रांनी दिली.