Mon, Apr 22, 2019 06:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खून, खंडणी वसुलीसाठी महिन्याला मिळायचे अवघे दहा हजार

खून, खंडणी वसुलीसाठी महिन्याला फक्त दहा हजार

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 22 2018 1:00AMठाणे : नरेंद्र राठोड

गुन्हेगारी जगतात अडकलेले शूटर्स फक्त काही हजारांसाठी कसे रक्तपाताचा खेळ खेळण्यास तयार होतात, याची काळी बाजू दाऊद इब्राहिमचा हस्तक नईम खान याच्या चौकशीतून उघड होऊ लागली आहे. स्वतःला अंडरवर्ल्ड जगताचा बादशाह म्हणवणारा आणि शेकडो कोटीत खेळणारा दाऊद इब्राहिम त्याच्या शार्प शूटरांना अवघ्या काही हजार रुपयांमध्ये वापरून कशा प्रकारे सोडून देतो याची कहाणीच नईम खान याने पोलिसांसमोर उघड केली आहे. धमकी, खंडणी वसुली आणि हत्या आदी कामासाठी मला डी गँगकडून अवघ्ये दहा हजार रुपये दरमहा मिळायचे, अशी कबुली नईमने पोलिसांना दिली आहे. 

नईम खानच्या गोरेगाव येथील बांगूर नगरातील घरातून एके 56 रायफलसह शस्त्रसाठा ठाणे खंडणीविरोधी पथकाने जप्त केल्या नंतर हा शस्त्रसाठा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला गेला होता याचा तपास ठाणे पोलीस नईमकडे करीत आहेत. दरम्यान, जप्त करण्यात आलेली एके 56 रायफल छोटा शकिलचा भाऊ अन्वर शेख याने माझ्याकडे 2014 साली पाठवली होती, अशी माहिती नईमने पोलिसांना दिली आहे. अन्वर याने फोनवरून संपर्क साधत, एक व्यक्ती बॅग घेऊन येईल. ती बॅग नीट सुरक्षित ठेवून घे, असे मला निर्देश दिले होते, असा जबाब नईमने ठाणे पोलिसांकडे दिला आहे. अन्वरने दिलेल्या निर्देशानुसार मला एका व्यक्तीने अंधेरी स्टेशनसमोर एक बॅग आणून दिली होती व त्यातच ही रायफल होती, अशी माहिती देखील नईमने पोलिसांना दिली आहे. मात्र ही रायफल कुठल्या उद्देशाने त्याच्याकडे पाठवण्यात आली होती याबाबत नईम काहीही माहिती पोलिसांना देत नसून या रायफलचा कुठे उपयोग होणार होता याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे तो सांगत आहे. 

नईमला 20 एप्रिल 2016 रोजी पोलिसांनी अटक केली असून तेव्हापासून तो ठाणे जेलमध्ये आहे. छोटा शकीलच्या सांगण्यावरून पश्चिम उपनगरांतील इक्बाल अत्तरवाला या व्यापार्‍याची हत्या करण्यासाठी गेलेल्या नईम खान याच्यासह मायकल जॉन डिसोजा ऊर्फ राजू पिल्ले आणि नितीन गुरव या शार्प शूटरांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जोगेश्‍वरीतून अटक केली होती. अत्तरवाला हा बिल्डर असून तो कधी काळी छोटा शकीलचा मित्र होता. मात्र एका बिल्डिंगच्या बांधकामावरून त्याचे अन छोटा शकीलचे बिनसले व त्याची हत्या करण्याचे निर्देश शकीलने नईमला दिले होते. याच अत्तरवालाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात नईम सध्या जेलमध्ये आहे. दरम्यान, त्याच्या घरात एके 56 रायफल आणि शस्त्रसाठा सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ठाणे जेलमधून ताब्यात घेतले आहे.

अत्तरवाला याच्या हत्येसाठी आम्हाला फक्त काही हजार रुपयेच मिळणार होते असे नईमने पोलिसांना सांगितले. धमकी देणे, खंडणी वसुली करणे आणि वेळ पडली तर हत्या करणे आदी कामांसाठी डी गँगकडून महिन्याकाठी अवघे दहा हजार रुपये मिळायचे, असे देखील नईमने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे. छोटा शकीलचा भाऊ अन्वर हा फोनवरून मला कामासंबंधी निर्देश द्यायचा अन तोच कधी पाच तर कधी दहा हजार रुपये कामापोटी द्यायचा. एकदा मी काम करण्यास नकार दिल्यावर अन्वरने तुला हे महागात पडेल अशी धमकी देखील मला दिली होती, असेही नईमने ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या चौकशीत सांगितले आहे. 

आर्थिक अडचणींमुळे ड्रग सप्लायर्सची मदत

ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केलेला ड्रग सप्लायर जाहिद अली काश्मिरी हा दाऊद गँगशी संबंधित असून तो नईमची पत्नी यास्मिन हिला आर्थिक मदत करायचा. नईम तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या परिवाराची वाताहत झाली आणि यास्मिनला जाहिद अलीची मदत घ्यावी लागली. कधी काळी दीपाली सुर्वे नाव असलेली मराठी मुलगी नईम खानच्या संपर्कात आली आणि यास्मिन बनली. यास्मिनला 16 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाची मुलगी आहे. आर्थिक मदतीच्या बदल्यात जाहिद यास्मिनच्या घरात ड्रग लपवून ठेवत होता. नईम पकडला गेल्यानंतर त्याच्या घरात लपवलेली एके 56 जाहिद यानेच दुसर्‍या ठिकाणी लपवून ठेवली.