Wed, Sep 19, 2018 19:07



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नदाफ इजाज अब्दुल रौफला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

नदाफ इजाज अब्दुल रौफला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:23AM



मुंबई : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी नांदेड जिल्ह्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफला यंदाचा (वर्ष 2017) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आयोजित शानदार सोहळ्यात 7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना 2017 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यातील 3 बालकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला होता, त्यांच्या नातेवाइकांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव ,भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या. एकूण चार श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानपत्र आणि रक्कम असे आहे.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणाले, पुरस्कारप्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा झाल्यापासून या शूर बालकांचे धाडसी कार्य प्रसार माध्यमांद्वारे देशभर पोहचले. देशभरातील बालकांसह संपूर्ण देशवासीयांसाठी या बालकांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी देशासाठी उत्तमोत्तम काम करावे असे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी  केले. मनेका गांधी यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील इजाज अब्दुल रौफला यावेळी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने प्रसंगावधान व धाडस दाखवून 2 मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले. त्याच्या या कामगिरीची नोंद घेऊन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही शूर बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी  यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अन्य मान्यवर व्यक्तींची  भेट घेतली आहे.