Tue, Mar 26, 2019 20:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एनजीओ महिलेच्या आत्महत्याप्रकरणी पतीला अटक

एनजीओ महिलेच्या आत्महत्याप्रकरणी पतीला अटक

Published On: Dec 11 2017 1:55AM | Last Updated: Dec 11 2017 1:00AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी

एनजीओमध्ये सदस्य असलेल्या वृषाली तेजस बाकडे या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी एक महिन्यानंतर तिच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात शनिवारी आग्रीपाडा पालिसांनी अटक केली. तेजस रमेश बाकडे असे या आरोपी पतीचे नाव असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वृषालीचा भाऊ रविंद्र केशव नेवगे यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रविंद्र हा कला शाखेचा पदवीधर असून सध्या त्यांचा ट्रॉन्सपोर्टचा व्यवसाय आहे. वृषाली ही त्यांची बहिण होती. तिचे संचित पवारशी प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर या दोघांचे पटत नव्हते. सतत होणार्‍या भांडणानंतर या दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांपूर्वी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर वृषाली ही तिच्या मैत्रिणीसोबत अंधेरी येथे राहत होती. याच दरम्यान तिचे तेजससोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. या दोघांनी नंतर विवाह केला. त्यांना पाच वर्षांची एक मुलगी आहे. वृषाली ही एका एनजीओमध्ये काम करत होती. मात्र पतीचे दारुचे व्यसन, बारमध्ये बारबालांवर होणार्‍या उधळपट्टीने त्यांच्यात काही महिन्यांपासून सतत खटके उडत होते. त्यातून तेजस हा तिचे मानसिक व शारीरिक शोषण करत होता. या त्रासाला कंटाळून तिने नोव्हेंबर महिन्यांत भायखळा येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी रविंद्र नेवगे यांच्या तक्रारीवरुन आग्रीपाडा पोलिसांनी वृषालीचा पती तेजस बाकडेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यांत एक महिन्याने त्याला पोलिसांनी अटक केली.