Wed, Apr 24, 2019 08:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नांदेडचा कृष्णा अग्रवाल राज्यात पहिला

नांदेडचा कृष्णा अग्रवाल राज्यात पहिला

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट’ म्हणेजच ‘नीट’ परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात महाराष्ट्रातला नांदेडचा कृष्णा अग्रवाल 720 पैकी 685 गुण मिळवून देशात सातवा तर राज्यात पहिला आला आहे. तर 691 गुण मिळवत बिहार येथील कल्पना कुमारी ही विद्यार्थिनी पहिली आली आहे. तिला 99.99 टक्के गुण मिळाले आहेत. देशभरातील पहिल्या 50जणांच्या गुणवत्तायादीमध्ये महाराष्ट्रातील केवळ 3 विद्यार्थी असले तरी पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षेच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने मंडळाकडून सोमवारी निकाल जाहीर केला. एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. हा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार होता. मात्र, न्यायालयाने स्थगिती दिल्याने निकाल एक दिवस आधीच जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी महत्वाची मानली जाणारी ही परीक्षा गेल्या 6 मे रोजी देशभरातील 136 शहरामधील 2 हजार 255 केंद्रांवर घेण्यात आली होती. यावर्षी तब्बल 13 लाख 26 हजार 725 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 लाख 69 हजार 922 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  10 लाख 60 हजार 923 जणांनी इंग्रजीतून तर हिंदीमधून 1 लाख 46 हजार542 जणांनी परीक्षा दिली. उर्वरित प्रादेशिक आठ भाषांतून 1 लाख 19 हजार 260विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी मराठी भाषेतून केवळ 1 हजार 169 विद्यार्थ्यांनी दिली होती. 7 लाख 14 हजार 562 विद्यार्थी पात्र झाले आहेत. ही उत्तीर्णतेची टक्केवारी 54 टक्के आहे.

कल्पना कुमारीने 99.99% गुणांसह देशात अव्वल स्थान कमावले आहे. कल्पनाला भौतिकशास्त्रामध्ये 180 पैकी 171, रसायनशास्त्रामध्ये 180 पैकी 160 तर जीवशास्त्र (बायोलॉजी) मध्ये 360 पैकी 360 मार्क्स मिळाले आहेत. तर महाराष्ट्रातील नांदेडचा कृष्णा अगरवाल 720 पैकी 685 गुण मिळवून देशात सातवा, गुंजन अतुल गटानी 675 गुण मिळवत 21 वा आला आहे आणि लोकेश पारस मंडलेचा 670 गुण मिळवत 37 वा आला आल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे.