Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जांबोरी मैदानातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गोविंदा शिवसेनेकडून हायजॅक!

जांबोरी मैदानातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गोविंदा शिवसेनेकडून हायजॅक!

Published On: Sep 02 2018 1:53AM | Last Updated: Sep 02 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी 

वरळी येथील जांबोरी मैदानात तब्बल 19 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरा करण्यात येणारा गोविंदा शिवसेनेने हायजॅक केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची ही खेळी राष्ट्रवादी काँग्रेसला हे तब्बल 15 दिवसानी समजली. त्यामुळे या गोविंदावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपन्याची शक्यता आहे. 

वरळीच्या जांबोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या संकल्प गोविंदाची मक्तेदारी होती. त्यामुळे या मैदानावर अन्य पक्षाला गोविंदा साजरा करता येत नव्हता. पण यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाने 3 सप्टेंबर रोजी उत्सव साजरा करण्यासाठी जांबोरी मैदान शिवसेनेला देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे.  त्यामुळे संकल्प प्रतिष्ठानकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत कोर्टात धाव घेण्याचा निर्णय संकल्प प्रतिष्ठानने घेतला आहे. जांबोरी मैदानावर 1991 पासून दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सवात उपस्थित राहणारे सिने कलावंत, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, यामुळे संकल्प प्रतिष्ठानचा उत्सव लोकप्रिय ठरला होता. मुंबईतील बहुतांश गोविंदा पथके जांबोरी मैदानावर आवर्जून हजेरी लावत होती. 2009 मध्ये जांबोरी मैदानावरील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला होता. हा अपवाद वगळता संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव अखंडपणे सुरू होता. 

दहीहंडीची उंची, थरातील लहान मुलांचा सहभाग यावरुन प्रकरण कोर्टात गेल्यामुळे दहिहंडीमध्ये बंधने आली. त्यामुळे मागिल तीन वर्षापासून या गोविंदामधील मज्जाच निघून गेली होती. यावेळी संकल्पाचा गोविंदा  साजरा करण्यासाठी मैदान भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. पण तत्पुर्वी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी जांबोरी मैदानात गोविंदा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी मिळवली. त्यामुळे संकल्पांच्या गोविंदाला पुर्णविराम मिळाला आहे. दहिहंडी उत्सवासाठी जांबोरी मैदान मिळावे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. या विभागाने आम्हाला परवानगी दिली असल्याचे आमदार सुनिल शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेला जांबोरी मैदानात उत्सव साजरा करायचा होता तर, त्यांनी त्याची कल्पना द्याायला हवी होती. मोठ्या मनाने आम्ही उत्सवासाठी मैदान दिले असते, असे मत माजी आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केले.