Wed, Jul 08, 2020 01:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तुमच्या ‘सुप्रमा’ हा भ्रष्टाचार नाही का?

तुमच्या ‘सुप्रमा’ हा भ्रष्टाचार नाही का?

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:45AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजप सरकारने तीन वर्षांत 307 सिंचन प्रकल्पांसाठी 40 हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ज्या निकषावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, त्या निकषावर या सुधारित प्रशासकीय मान्यता हा भ्रष्टाचार आहे की नाही, याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.  

कृषी सिंचन योजनेमध्ये केंद्र सरकार 60 टक्के रक्‍कम देणार होते. त्यामुळे 20 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. परंतु, भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी या योजनेचे नाव बदलून या प्रकल्पांची किंमत 32  हजार कोटी रुपयांवर नेली. याचा अर्थ राज्य सरकारने प्रकल्पांच्या किमतीमध्ये 12 हजार कोटींची वाढ केली. त्यामुळे वाढीव रकमेला केंद्राने मान्यताच दिली नाही. केंद्र सरकार मान्यता देत नाही म्हणून ‘नाबार्ड’च्या माध्यमातून हे पैसे खर्च केले गेले. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही? याचा खुलासा सरकारने करावा, असे नवाब मलिक म्हणाले. 

खडसेेंचे पक्षात स्वागतच 

भाजपने नारायण राणे यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले. एकनाथ खडसे हे देखील पक्षात अस्वस्थ आहेत. ते जर भाजप सोडून राष्ट्रवादीत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही मलिक म्हणाले.

मोपलवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण गेल्या तीन वर्षांत 18 पेक्षा जास्त मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले.  शिवाय सनदी अधिकार्‍यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले असताना मंत्र्यांप्रमाणे त्यांनाही मुख्यमंत्री पाठीशी घालत आहेत. 

सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली होती. या अधिकार्‍यांच्या चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. 

परंतु, या समितीने मोपलवार यांना क्लीन चिट दिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा समृद्धी महामार्गाची जबाबदारी दिली. समृद्धी महामार्ग हा सर्वात मोठा घोटाळा आहे. 

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे काम सनदी अधिकार्‍यांनी केले. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग काही अधिकारी आणि भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग बनला आहे. त्यामुळेच ते काम सुरूच रहावे म्हणून मोपलवार यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकार्‍याची नियुक्‍ती करण्यात आली. 

मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.