Tue, Jul 23, 2019 04:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राष्ट्रवादी नगरसेवकांना सेनेकडून समित्यांचे गाजर

राष्ट्रवादी नगरसेवकांना सेनेकडून समित्यांचे गाजर

Published On: Apr 12 2018 1:31AM | Last Updated: Apr 12 2018 1:30AMमुंबई : राजेश सावंत

मुंबई महापालिकेतील ताकद वाढवण्यासाठी आता शिवसेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांवर फासा टाकला आहे. यात महत्त्वाची भूमिका शिवसेनेचे सचिव निभावत असल्याचे बोलले जात आहे. नगरसेवकांना समित्यांचे अध्यक्षपद व मोठ्या समित्यांच्या सदस्यपदाचे गाजर दाखवण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील काही नगरसेवकांच्या गुपचूप एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटी-गाठीही घेतल्याचे समजते.

मुंबई महापालिकेत पाच वर्ष सत्ता टिकवायची असेल तर, नगरसेवकांचा आकडा 100 च्यावर नेण्यासाठी शिवसेनेचे दोन शिलेदार कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याची जबाबदारी या दोघांनी स्वीकारल्याचे बोलले जात आहे. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक असून त्यापैकी सात नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. याची कोणालाही कल्पना येऊ नये, म्हणून पालिकेतील वरिष्ठ नगरसेवकांनाही या मोहिमेपासून दूर ठेवण्यात आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला हाताशी धरून ही मोहीम हाती घेतल्याचेही समजते. अलिकडेच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यासोबत नार्वेकर व परब यांची चर्चा झाली. यावेळी काही नगरसेवकही उपस्थित होते. त्यामुळे येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

मनसे नगरसेवकांच्या प्रवेशानंतर पालिकेतील शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ 94 झाले आहे. पण या संख्याबळावर दीड वर्षानंतर येणार्‍या महापौर व उपमहापौर निवडणूकीत सामोरे जाणे सेनेला सोपे नाही. या निवडणूकीत भाजपा अन्य पक्षाच्या नगरसेवकांना फोडून महापौर निवडणूक जिंकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवसेनेने फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याचे समजते. 

Tags : mumbai, NCPs corporator,  member committee, bait, Shivsena, mumbai news,