Thu, Jul 18, 2019 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंढरपूरला न जाण्याच्या निर्णयावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांवर टीका 

शब्द पाळला असता तर ही वेळ आली नसती : जयंत पाटील

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी 

राज्य सरकारने मराठा समाजाचे वेळीच समाधान केले असते, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होणार्‍या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली नसती. आरक्षणाच्या मुद्यावर मराठा, धनगर समाजाची भाजपा सरकारने निव्वळ फसवणूक चालविली असून मराठा समाजाच्या भावना विकोपाला गेल्यानेच मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा टाळावी लागल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.  

सततची खोटी आश्‍वासने आणि फसवणुकीला राज्यातील जनता आता कंटाळली आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की हा या खोट्या कारभाराचा परिपाक आहे. जनता जनार्दनाला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याची सुबुद्धी विठ्ठलाने मुख्यमंत्र्यांना द्यावी, असा टोला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. 

जनतेच्या संतापाचा सामना करावा लागू नये म्हणे म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या महापूजेला न जाण्याची पळवाट शोधली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांना मराठा, धनगर, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नापासून पळ काढता येणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.पंढरपूरच्या शासकीय पूजेला उपस्थित न राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्य सरकार केवळ आश्‍वासने देत आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत झालेल्या फसवणुकीमुळे मराठा समाजाच्या भावना विकोपाला गेल्या आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. एखाद्या समाजाने स्वत:हून मुद्दा हातात घेतला तर त्याचे राजकारण होत आहे, अशी ओरड केली जाते. याउलट मराठा समाजाच्या लोकांना विश्‍वासात घेऊन वेळीच त्यांचे समाधान केले असते तर आजची वेळ ओढावली नसती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.