Thu, Feb 21, 2019 06:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

Published On: Jan 02 2018 1:03PM | Last Updated: Jan 02 2018 1:06PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

भीमा कोरेगावप्रकरणात सामंजस्याची भूमिका घेवून सामाजिक सलोखा कायम राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

काही हिंदूत्ववादी संघटनांनी पुणे शहरात येवून ३-४ दिवसापासून चिथावणी देण्याची भूमिका घेतली होती असे तिथले लोक सांगत आहेत. त्यामुळे आधीपासूनच इथे अस्वस्थतेचे वातावरण होते. भीमा कोरेगाव येथे लाखोच्या संख्येने लोक येणार हे माहित असताना यंत्रणेने खबरदारी घ्यायला हवी होती. ती प्रशासनाने न घेतल्यामुळे अफवा आणि गैरसमज अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडल्याचे शरद पवार म्हणाले.

भीमा कोरेगावला दरवर्षी लोक जात असतात. आजपर्यंत कधीही तिथे स्थानिकांसोबत संघर्ष झालेला नाही. भीमा कोरेगावला २०० वर्ष पूर्ण झाली त्यामुळे मोठया संख्येने लोक येणार ही कल्पना होतीच. त्याठिकाणच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा असेही पवार म्हणाले.

याठिकाणी नांदेड जिल्हयातील एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतीत लगेच काळजी घेतली ते बरं झालं. हे प्रकरण चिघळू दयायला नको. जे घडले त्याची चौकशी राज्यसरकारने करावी. घडलेला प्रकार शोभनीय नाही. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी सामंजस्य आणि संयमाने कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता परिस्थिती हाताळणे आवश्यक आहे असेही शरद पवार म्हणाले.