Mon, May 20, 2019 11:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्तेचा इतका गैरवापर पाहिला नव्हता

सत्तेचा इतका गैरवापर पाहिला नव्हता

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राजकीय जीवनात अनेक निवडणुका पाहिल्या. मात्र पालघर पोटनिवडणुकीत सत्तेचा झाला तेवढा गैरवापर कधीही पाहिला नव्हता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. निवडणूक यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा यांनी मर्यादा सोडून वागू नये, यासाठी भूमिका घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. 

भंडारा — गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, पोटनिवडणुकीच्या काळात शनिवारी, रविवारी देखील बँका उघड्या ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. या दोन दिवसात पैशांचे वाटप करण्यास सांगण्यात आले. कोणत्याही मार्गाने निवडणूक जिंकणे हेच त्यांचे ध्येय होते. भंडारा-गोंदियात झालेल्या प्रकारानंतर संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दहा वर्षं निवडणुकीची जबाबदारी न देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.  

समविचारी पक्षांनी लोकमानस काय आहे हे समजून घेऊन भाजप विरोधात एकत्र यावे, विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला आवडेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

पालघर पोटनिवडणुकीवरून शरद पवार यांची टीका

देशात झालेल्या पोटनिवडणुकीत 10 पैकी 9 ठिकाणी सत्ताधारी पक्ष हरतोय ही गोष्ट लहान नाही. 1977 साली देखील असाच एकेक पराभव व्हायला सुरुवात झाली आणि त्यावेळी मजबूत वाटत असलेले सरकार गेले होते. आज तेच चित्र पुन्हा एकदा देशात दिसण्याची शक्यता आहे, असे भाकीतही शरद पवार यांनी केले.