Wed, Jun 26, 2019 23:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दीडपट हमीभावाची घोषणा ही निव्वळ धूळफेक : शरद पवार

दीडपट हमीभावाची घोषणा ही निव्वळ धूळफेक : शरद पवार

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

शेतमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू अशी मागणी शेतकरीवर्गातून सातत्याने होत आहे. त्या लागू केल्याचे चित्र केंद्र सरकार उभे करून आधीच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची सरकारची घोषणा निव्वळ धूळफेक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. 

खरीप हंगामातील पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करून निवडणुकीतील आश्‍वासनाची पूर्ती केल्याची घोषणा सरकारने केली. हमीभावातील वाढ ही ऐतिहासिक असल्याचा बडेजावदेखील करण्यात आला. परंतु वस्तुस्थिती वेगळीच असून शेती उत्पादनासाठी लागणार्‍या सर्वंकष खर्चाचा आधार घेऊन हमीभाव जाहीर केला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केंद्राला केलेल्या हमीभावाची शिफारससुद्धा विचारात घेण्यात आली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. 

भात, भुईमूग, कापूस, गहू या पिकांना हमीभाव जाहीर करताना केंद्राने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. डाळ व कडधान्य वर्गातील पिकांच्या उत्पादनात सातत्याने वाढ आणि स्वयंपूर्णता करावयाचे धोरण ठेवले असेल तर त्या पिकांनादेखील ठोस हमीभाव देणे गरजेचे आहे. स्वामिनाथन समितीने उत्पादन खर्चावर 50 टक्के वाढीइतका हमीभाव देण्याची शिफारस केली होती आणि त्याच आधारे पंतप्रधानांनी हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात केवळ दुसरेच सूत्र अवलंबलेले दिसते, त्यामुळे खोलात जाऊन पिकांच्या उत्पादन खर्चाची आकडेवारी तपासण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.