Thu, May 28, 2020 18:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गेलेल्या कावळ्यांची चिंता  नको; मावळ्यांची करा

गेलेल्या कावळ्यांची चिंता  नको; मावळ्यांची करा

Published On: Aug 19 2019 1:38AM | Last Updated: Aug 19 2019 1:37AM
मुंबई : खास प्रतिनिधी

विरोधी पक्षांतील ज्या नेत्यांवर खटले सुरू आहेत. त्यांच्यावर सत्ताधार्‍यांकडून दबाव आणला जात आहे. त्यामुळेच अनेकजण पक्ष सोडत आहेत. मात्र, आता गेलेल्या कावळ्यांची चिंता न करता मावळ्यांची चिंता करा आणि पक्ष पुढे घेऊन चला, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी  केले. पूरग्रस्तांना सरकारने मदत न केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जे पक्ष सोडून गेले ते वैयक्तिक  कारणांमुळे गेले आहेत. मात्र, आपल्याला जोमाने काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. महिला राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत पवार बोलत होेते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनोवृत्तीवर जरब बसवणारी यंत्रणाच ढिसाळ झाली असून, जे राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत, ते ही यंत्रणा काय चालवणार? अशी टीका पवार यांनी केली. 

रेडिमेड नको, मापाचे कपडे शिवून घ्या

भाजपचे काँग्रेसीकरण सुरू असून, राष्ट्रवादीने मोठे केलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली. रेडिमेड कपड्यांपेक्षा शिवून कपडे घेणारे लोक राजकारणात महत्त्वाचे असतात. त्यामुळे  मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मापाचे कपडे शिवून घ्यावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.