Thu, Jul 18, 2019 10:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारविरोधात टोकाची भूमिका घ्या

सरकारविरोधात टोकाची भूमिका घ्या

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:05AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

शेतकर्‍यांना दिलेली आश्‍वासने केंद्र आणि राज्य सरकारने पाळलेली नाहीत. आश्‍वासने पाळण्याची सरकारमध्ये नियतही दिसत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हा संघर्ष आता प्रश्न सुटेपर्यंत थांबवू नका. त्यासाठी  शेतकर्‍यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.शेतकर्‍यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देतानाच शेतमालाची नासाडी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.  

मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने देशभरातील शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारनेही दिलेली आश्‍वासने पाळलेली नाहीत. सरकारच्या निषेधार्थ शेतकरी आपला  शेतीमाल रस्त्यावर फेकून देत आहे, ही बाब चिंतेची असल्याचे पवार म्हणाले. 

बळीराजा हा कधी सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला आता शेती व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत आहे. शेतकर्‍यांनी आपले आंदोलन सुरु ठेवताना सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये, त्यांनी दूध रस्त्यावर ओतणे, भाजीपाला रस्त्यावर फेकणे हे प्रकार टाळावेत. गरीबांना हा शेतीमाल वाटावा, असे पवार म्हणाले. 

शेतमाल वाटल्याने तुम्ही कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि सरकारलाही तुमचा आक्रोश समजेल. यामाध्यमातून गरीबांचीही आंदोलनाला सहानुभूती मिळेल, असे पवार म्हणाले. आपण शेतकरी असल्याने शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी उत्पादन खर्च अधिक 50 टक्के फायदा शेतकर्‍यांना दिला जाईल.  शेतमालाला आधारभूत किंमत दिली जाईल, अशी आश्‍वासने दिली. पण चार वर्ष झाली तरी त्यांची अंमलबजावणी झाली नाही. शेतकरी या आश्‍वासनांच्या अंमलबजावणीची मागणी करीत आहेत. हे आंदोलन पहिल्यांदा झाले नसून विविध राज्यात शेतकर्‍यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही शेतकरी सातत्याने रस्त्यावर येवून आपली भूमिका मांडत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. समाजातील इतर घटकांनी शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे रहावे. हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाचा कार्यक्रम नाही, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.