Wed, Apr 24, 2019 19:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘छत्रपतींच्या आशिर्वादाची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नाही’

‘छत्रपतींच्या आशिर्वादाची मुख्यमंत्र्यांना गरज वाटत नाही’

Published On: Jun 07 2018 3:56PM | Last Updated: Jun 07 2018 3:50PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

भाजप सरकारला छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगडाचा विसर पडला असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अवघा महाराष्ट्र शिवभक्तांच्या घोषणांनी दुमदुमला असताना राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मागे-मागे करण्यातच धन्यता मानल्याचेही जयंत पाटील म्हणाले.  

शिवराज्याभिषेकासाठी गेलेल्या एका तरूणाचा गडावरील दगड डोक्यात पडल्याने मृत्यू झाला. यावरूनही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला धारेधर धरले. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाने आवश्यक ती काळजी घेतली नाही, त्यामुळेच अशोक उंबरे या शिवभक्ताला प्राणाला मुकावे लागले. भाजपला रायगडाची आता आठवण होणार नाही, असे ते म्हणाले. 

निवडणुकीच्यावेळी भाजप ज्या घोषणा देत होते. त्याचाही त्यांना आता विसर पडला आहे. शिवाजी महाराजांचे नाव फक्त निवडणुकीला वापरण्याची बाजपची ही जुनी सवय असल्याचेही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

जयंत पाटील यांचे ट्विट..जसेच्या तसे...

'छत्रपतींचा आशीर्वाद,चला देऊ मोदींना साथ' या घोषणेचा भाजपाला विसर पडल्याने, शिवराज्याभिषेकाला रायगडावर जाण्याऐवजी अमित शहांसोबत मुंबईची सैर करण्यात धन्यता मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सध्या आपल्या छत्रपतींचा आशीर्वाद घेण्याची गरज वाटत नाही : जयंत पाटील 

‘रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाने आवश्यक ती काळजी घेतली नाही, त्यामुळेच अशोक उंबरे या शिवभक्ताला प्राणाला मुकावे लागले. भाजपाला रायगडाची आता आठवण होणार नाही, कारण निवडणुकांपुरते महाराजांचे नाव वापरण्याची भाजपाची सवय जुनीच आहे’ : जयंत पाटील