Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गांधीजींच्या विचारांना संपवण्याचा डाव : मुंडे

गांधीजींच्या विचारांना संपवण्याचा डाव : मुंडे

Published On: Apr 28 2018 11:31AM | Last Updated: Apr 28 2018 12:03PMमुंबई :पुढारी ऑनलाईन

देशाला समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार महात्मा गांधीजींनी दिला. त्यांच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा रद्द का केली, असा सवाल विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला केला आहे. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

गांधीजींच्या जयंती दिनी होत असलेल्या ग्रामसभा इथून पुढे घेतल्या जाणार नसल्याचे पत्रक सरकारने काढले आहे. याचा निषेध म्हणूनच धनंजय मुंडेनी सरकारवर हल्ला चढवला. यासंदर्भातील एक ट्विट त्यांनी केले आहे. 

'राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे. सरकारचा जाहीर निषेध !' असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी सरकारने काढलेले पत्रकही जोडले आहे. 

Image may contain: text

काय आहे पत्रक 

ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार चार ग्रामसभांव्यतिरिक्त राज्य सरकारच्या इतर प्रशासकीय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या योजना किंवा सभा जिल्हा परिषदांना अचानक सांगण्यात येतात. अचानक होणाऱ्या अशा सभांमुळे ग्रामसभांची संख्या वाढते. तसेच या ग्रामसभांना ग्रामस्थांचा कमी प्रतिसाद मिळतो.  त्यामुळे अशा सभांमधून कोणत्याही विषयांवरील समाधानकारक उत्तर सापडत नाही. त्यामुळे अशा अचानक घेतलेल्या सभा निष्फळ ठरतात. त्यामुळे अशा सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फरमान राज्य सरकारने काढले आहे. 

ग्रामसभांच्या तारखा बदलल्या

याआधी १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर आणि २६ जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित केल्या जात होत्या.  पण, आता त्या मे, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या या पत्रकात म्हटले आहे.