Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एनसीएमएलचा अहवाल प्रकाशित; तांदूळ, ऊस, तेलबिया उत्पादनात वाढीचे संकेत 

एनसीएमएलचा अहवाल प्रकाशित; तांदूळ, ऊस, तेलबिया उत्पादनात वाढीचे संकेत 

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:32AMमुंबई ः प्रतिनिधी

यंदा पावसाच्या अनियमिततेने खरीप पिकांच्या उत्पादनांमध्ये बर्‍यापैकी घट होणार असली तरी तांदूळ, मूग, तेलबिया, कापूस, ऊस आदी पिकांच्या उत्पादनात मात्र बर्‍यापैकी वाढ होईल, असा अंदाज नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड(एनसीएमएल)ने आपल्या वार्षिक अहवालात व्यक्त केला आहे. 

एनसीएमएल ही शेतीविषयक कापणीपश्‍चात व्यवस्थापन कंपनी असून कंपनीने 2018-19 या आर्थिक वर्षात 137.73 दशलक्ष टन खरीपाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षी हेच उत्पादन 138.73 दशलक्ष टन होते. खरीपाच्या उत्पादनातील ही घट 0.72 टक्के इतकी आहे. यंदाच्या उत्पादनावर अनियमित पावसाचा परिणाम होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जूनमधील पावसाचा अंदाज चुकला असून अनेक ठिकाणी तो प्रमाणापेक्षा कमी पडला आहे. जुलैमध्ये पाऊस चांगला असला तरी यंदाचा मान्सून हा तुकड्यातुकड्यांमध्ये कोसळणार असून देशात वेगवेगळ्या प्रदेशात टप्प्याटप्प्याने पडणार असल्याने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. 

यावर्षी खरीपातील महत्त्वाचे पीक असलेल्या तांदळाच्या उत्पादनात किंचित वाढ संभवते. गतवर्षी 96.39 दशलक्ष टन उत्पादन झाले होते. ते यंदा 96.8 दशलक्ष टनांवर जाईल. गतवर्षी निर्यातीला मिळालेल्या चालनेमुळे भाताच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मका, ज्वारी, बाजरी या पिकांच्या उत्पादनात मात्र घट होणार आहे. तर, गतवर्षी तूरडाळीचे विक्रमी उत्पादन, डाळीची झालेली आयात त्यामुळे डाळीचे क्षेत्र घटले असून उत्पादनात 10 टक्क्यांची घट होणार आहे. 

मूगाच्या उत्पादनात 5.8 टक्क्यांची वाढ होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर तेलबियांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात विक्रमी उत्पादनाचे संकेत आहेत. सोयाबीनचे उत्पादन यंदा 13.3 दशलक्ष टनावर जाण्याचा अंदाज आहे. तर शेंगदानाच्या उत्पादनात घट होणार आहे. तिळाच्या उत्पादनात मात्र 2.8 टक्क्यांच्या वाढीचे संकेत आहेत. 

उसाच्या उत्पादनातही वाढ होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ऊसक्षेत्र वाढीबरोबरच यंदा ऊसाचे उत्पादन 360 दशलक्ष टन्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे साखरेच्या शिल्लक साठ्यात भरच पडेल. शेतकरी कापसाकडे वळल्यामुळे कापसाच्या उत्पादनातही वाढ अपेक्षित असून गतवर्षीच्या 34.86 दशलक्ष गासड्यांवरून ते 37.5 दशलक्ष गासड्यांवर जाईल असा वर्तवण्यात आला आहे.