Tue, Mar 19, 2019 20:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिल्हाधिकार्‍यांच्या खोट्या सह्या करून एनए परवाना घोटाळा

जिल्हाधिकार्‍यांच्या खोट्या सह्या करून एनए परवाना घोटाळा

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:18AM

बुकमार्क करा
ठाणे : दिलीप शिंदे

तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विनी जोशी यांची सही व शिक्के मारलेले बोगस बिनशेती परवाने (एनए) आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बनावट विकास प्रस्तावाद्वारे 27 गावांमध्ये सरकारी व खासगी जमिनींवर इमारती बांधण्याचा सपाटा भूमाफियांनी लावला आहे. या अनधिकृत इमारतींमधील सदनिकांच्या नोंदणीसाठी प्रत्येकी 70 हजार रुपये घेणारे कल्याणचे दुय्यम निबंधक हेच या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचे महसूल विभागाच्या तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे शुक्रवारी डोंबिवलीतील बल्लाळेश्‍वर कन्ट्रक्शनचे भागीदार सुभाष पाटोळे यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घोटाळ्यामुळे गेल्या तीन महिन्यात नोंदणी झालेल्या सर्व सदनिकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेद्र कल्याणकर यांनी कल्याण तहसीलदारांना दिले आहेत.  

शासनाने अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन बंद केले असतानाही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमधील घरांची नोंदणी सर्रासपणे सुरू आहे. एका नोंदणीसाठी दुय्यम निबंधकांचा भाव 30 हजार ते 70 हजार रुपये एवढा आहे. त्यासाठी बनावट एनए आणि महापालिकेचे आराखडे जोडले जात असल्याची ओरड सुरू असताना जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विनी जोशी यांची बनावट सह्याची वापर करण्यात आला. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकार्‍यांच्या बनावट सह्यांद्वारे विकास प्रस्ताव मंजूर असल्याचे दाखवून इमारती उभ्या केल्या जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे 5 जानेवारीला  कल्याण क्रमांक 3 चे सह दुय्यम निबंधक निलेश राठोड यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात  बल्लाळेश्‍वर कन्स्ट्रक्शनचे भागीदार सुभाष पाटोळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

27 गावांमधील सरकारी व खासगी जमिनीवर अगोदरच सुमारे 80 हजार अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ही गांवे महापालिकेत पुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी बांधकामांची नोंदणी बंद केली आहे. तसेच यापूर्वीचे ग्रामपंचायतीचे सही, शिक्के हेदेखील रद्दबातल ठरविले आहे. असे असतानाही  सहनिबंधक कार्यालय, कल्याण 3 येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत सदनिकांची नोंदणी केली जात आहे. याबाबत हर्षद म्हात्रे आणि फसवणूक झालेले सचिन साळेकर दाम्पत्यांनी जिल्हाधिकार्‍यांसह सह- दुय्यम निबंधकांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी डोंबिवली येथील नांदिवली पंचनांद येथील सर्वे नं. 46 हिस्सा नं. 1 चे क्षेत्र 1800 चौरस मीटरपैकी 900 चौरस मीटरवर उभारलेल्या श्री सदगुरू छाया या इमारतीच्या एनए परवान्याची चौकशी लावली. या चौकशीत तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विनी जोशी यांनी 2014 मध्ये ही जमीन एनए केली नसल्याचे आढळून आले. त्यांची बनावट सही, शिक्के मारलेला एनए परवाना आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचा बनावट प्लॅन सादर करून बिल्डर पाटोळे यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये 22 सदनिकांची अधिकृत नोंदणी केल्याचे दिसून आले. 

ही नोंदणी करणारे कल्याण-2 चे दुय्यम निबंधक यांनीच असे बनावट एनए आणि प्लॅन जोडण्याचा सल्ला बिल्डराला दिला आणि प्रत्येक सदनिकेमागे नोंदणीसाठी 70 हजार रुपये उकळले. अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांचा शासकीय महसूल बुडविण्यात आला असून ग्राहकांचीही मोठी फसवणूक केली जात आहे. या टोळीचा म्होरक्या दुय्यम निबंधक असल्याने कल्याण-डोंबिवलीमध्ये मागील तीन महिन्यात झालेल्या सर्व नोंदणीची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कल्याण तहसीलदारांना दिले आहेत. त्याचबरोबर नोंदणी करताना दस्तावेजांची खातरजमा करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आलेले आहे. 

याप्रकरणी मानपाड्यामध्ये एका बिल्डरवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर दुय्यम निबंधकांसह अन्य सरकारी अधिकारी आणि विकासकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.