Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘तिहेरी तलाक’साठी मुस्लिम महिलांचा मोर्चा

‘तिहेरी तलाक’साठी मुस्लिम महिलांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

तिहेरी तलाकविरोधी विधेयकाच्या निषेधार्थ शनिवारी आझाद मैदानात आयोजित मुस्लिम महिलांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सरकारने संसदेत मांडलेले हे विधेयक इस्लामिक शरियत कायद्याचे उल्लंघन करणारे असून, सरकार या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल यांची भेट घेऊन आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले. 

इस्लाममध्ये स्त्री-पुरुष समानता नव्हे तर स्त्री-पुरुष न्यायाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आम्हाला सरकारचे विधेयक मंजूर नसून आम्हाला आमच्या शरियतप्रमाणे वागण्याची परवागनी मिळावी अशी मागणी यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात केली. सरकारने केवळ राजकीय अभिनिवेशातून हे विधेयक आणले असून मुस्लिम समाजाच्या प्रति सरकारला कळवळा असेल तर सरकारने मुस्लिम नागरिकांना सरकारी नोकरी, शिक्षण यामध्ये आरक्षण द्यावे, धर्माच्या आधारावर अनेक ठिकाणी नाकारण्याचे प्रसंग घडतात ते रोखण्यासाठी पावले उचलावीत, खोट्या गुन्ह्यांमध्ये मुस्लिम तरुणांना अडकवण्याचे प्रकार बंद करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. 

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. आस्मा जेहरा, सदस्या जकिया शेख, इशरत शेख, सालेहा सोहेल, अर्शिया शकील, सुमय्या नोमाणी, आईन रझा, प्रा.मोनीसा बुशरा, फरहा जाफ्री, सलमा रिझवी, अ‍ॅड. मुन्नवरा अलवारे यांनी यावेळी अस्खलित मराठीमध्ये भाषण केले. 

मुस्लिम महिलांना शरियत कायद्याने अनेक हक्क दिले असून त्यामध्ये सरकारने ढवळाढवळ करण्याची काही गरज नाही, असे यावेळी सरकारला ठणकावून सांगण्यात आले. आंदोलकांना पिण्याचे पाणी, बिस्कीटे देण्याची व्यवस्था रहमानी ग्रुपचे आसिफ सरदार व इतरांनी केली होती. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी माजी मंत्री आरिफ नसीम खान, आमदार अबू आसिम आझमी, मौलाना मेहमूद दर्याबादी, हाफिज सय्यद अतहर अली, फरीद शेख, मौलाना खलीलूर रहमान नुरी, अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी, माजी आमदार सोहेल लोखंडवाला, मौलाना अनीस अश्रफी, मुफ्ती सईद अख्तर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


  •