Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नमाज पढण्यास नकार दिल्याने मुलीची हत्या

नमाज पढण्यास नकार दिल्याने मुलीची हत्या

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 11 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी

दर शुक्रवारी नमाज पढण्यास नकार दिल्याने तिघींनी 15 वर्षीय मुलीला मारहाण करत तिची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सायनमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन अ‍ॅन्टॉपहिल पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन मुलींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायनच्या अ‍ॅन्टॉपहिल परिसरातील नातेवाइकांच्या घरी 15 वर्षीय मिनाझ कुरेशी राहात होती. तिचे वडील कामानिमित्त घराबाहेर असतात तर लहानपणीच आईचे निधन झाले आहे. नेहमीप्रमाणे गेल्या शुक्रवारी मिनाझने नमाज पढण्यास नकार दिला. याच रागातून काकी साबीरा सय्यद आणि तिच्या दोन मुलींनी मिनाझला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर साबीराने ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून मिनाझची हत्या केली.

आपल्या हातून हत्या घडल्याचे लक्षात येताच तिघींनीही तब्बल अर्धातास मिनाझचा मृतदेह बाथरुममध्ये दडवून ठेवला. त्यानंतर साळसूदपणेतीला उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल केले. बाथरुममध्ये पडल्याने मिनाझ बेशुद्ध पडल्याचे साबीरा येथील डॉक्टरांना सांगत होती. मात्र डॉक्टरांनी केलेल्या तपासात मिनाझच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा आढळल्या. उपचारांदरम्यान मिनाझचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.

सायन रुग्णालयात पोहचलेल्या अ‍ॅन्टॉपहील पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेची नोंद करत तपास सुरू केला. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच वडील हुसेन कुरेशी यांना धक्का बसला. त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तोपर्यंत पोलिसांनी साबीराकडे केलेल्या कसून चौकशी सुरु केली होती. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र शवविच्छेदन अहवालात गळा आवळून मिनाझची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट होताच तीने गुन्ह्याची कबुली दिली. अखेर साबीरासह तीच्या दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.