होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये वस्तुसंग्रहालय 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये वस्तुसंग्रहालय 

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी 

मध्य रेल्वेचे मुख्यालय असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ऐतिहासिक वास्तूचे जागतिक दर्जाच्या वस्तुसंग्रहालयात रुपांतर केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध वास्तुविशारदांकडून आराखडे मागविण्यात आले आहेत. या इमारतीतील कार्यालय अन्यत्र हलविण्यात येणार असल्याने त्याला रेल्वेच्या कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस इमारतीच्या तळमजल्यावर सध्या छोटे वस्तुसंग्रहालय आहे, तर इमारतीत अनेक कार्यालये आणि 500 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतात. याच इमारतीत जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.त्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य इमारतीतील कार्यालय हार्बरच्या फलाट क्रमांक एकला लागूनच असलेल्या अ‍ॅनेक्स इमारतीत हलविण्याची योजना आहे, तर काही कार्यालये जे.जे. कला महाविद्यालयाच्या जागेतही स्थलांतरित करण्याच्या विचारात आहे. वस्तुसंग्रहालयासाठी रेल्वेच्या राईट संस्थेने रेल्वेने वास्तुविशारदांकडून निविदा मागविल्या असून येत्या 9 मार्चपूर्वी निविदापूर्व बैठकही ठेवण्यात आली आहे.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही या संग्रहालयासाठी 25 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे या कामांना गती देण्यात येत असून वस्तुसंग्रहालय झाल्यास याच इमारतीत मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसेल. वस्तुसंग्रहालयाच्या निर्णयाला रेल्वेच्या कर्मचारी संघटनांनी विरोधही केला आहे. तर, रेल्वेमंत्र्यांकडेही कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करु नये अशी लेखी स्वरुपात मागणी केली आहे.