Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मरेची ईएमयू नाबाद ९३

मरेची ईएमयू नाबाद ९३

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:13AMमुंबई : प्रतिनिधी 

इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट अर्थात इएमयू लोकलला मुंबई उपनगरीय सेवेमध्ये शनिवारी 93 वर्षे पूर्ण झाली. 3 फेब्रुवारी 1925 रोजी चार डब्यांसहित तत्कालिन बॉम्बे व्हीटी येथून कुर्लादरम्यान हार्बर मार्गावर ही लोकल धावली होती. 1925 मध्ये चार डब्यांसहित दैनंदिन 150 फेर्‍या होत असत. ही संख्या पंधरा व बारा डब्यांसहित 2018 मध्ये तब्बल 1732 वर गेली आहे.  त्यानिमित्त मध्य रेल्वेने केक कापून आपला आनंद साजरा केला. हार्बर मार्गावरील चार डब्यांनी सुरू झालेली सेवा आज मध्य रेल्वेच्या मार्गावर 15 डब्यांपर्यंत वाढवण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. 

लवकरच हार्बर मार्गावर अत्याधुनिक बंबार्डियर लोकलदेखील चालवण्यात येईल व मध्य रेल्वेच्या सेवेत नवीन शिरपेच रोवण्यात येईल, असा विश्‍वास मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. प्रवाशांना सुखद, सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासहित, हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुख्य मेकॅनिकल इंजीनियर के. पी. सोमकुवर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के.जैन, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, साकेत मिश्रा, जनयु जिनेश आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.