होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुरबाडच्या आजीबाईंची शाळा सातासमुद्रापार!

मुरबाडच्या आजीबाईंची शाळा सातासमुद्रापार!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुरबाड : बाळासाहेब भालेराव

मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात सुरू झालेली आजीबाईंची शाळा देशाप्रमाणेच सातासमुद्रापारही पोहोचली आहे. येथील अशिक्षित आजीबाईंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या अनोख्या शाळेचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले आहे. योगेंद्र बांगर या शिक्षकाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. बांगर यांच्या याच संकल्पनेची दखल घेत त्यांना थेट कॅनडातून निमंत्रण धाडण्यात आले आहे. कॅनडामधील एका संस्थेने ही संकल्पना उचलून धरत आजीबाईंची शाळा उपक्रम त्यांच्या देशात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुरबाड तालुक्यातील नाणेघाटाच्या पायथ्याजवळ असलेल्या फांगणे गावात 2016 च्या महिला दिनी आजीबाईंच्या शाळेचा प्रारंभ झाला. मोतीराम गणपत दलाल ट्रस्टच्या विशेष सहकार्याने ही शाळा सुरू झाली. याचे सर्वत्र विशेष कौतुक झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही या शाळेला भेट देऊन संपूर्ण जगाला या शाळेची ओळख घडवून दिली. गणवेश, दप्तर आणि शिक्षण यामध्ये तल्लीन झालेल्या या शाळेतील आजीबाईंनी या परिसराला एका वर्षात आंतरराष्ट्रीय ओळख करून दिली.

येथील शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाला गावातील सुजाण नागरिकांनीही पाठिंबा देऊन तो पूर्णपणे यशस्वी केला. गेल्या दीड वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून अनेक परदेशी पाहुणे या शाळेला भेट देत आहेत. याविषयीची माहिती कॅनडातील एका सामाजिक संस्थेला समजल्यानंतर त्यांनीही त्यांच्या देशातील आदिवासी भागात असा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी थेट योगेंद्र बांगर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती करून घेतली. तसेच त्यांनाही या उपक्रमात मदत करण्यासाठी कॅनडामध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, बांगर यांनी निमंत्रणाचा स्वीकार करत पुढील महिन्यात कॅनडाला जाणार असल्याची माहिती दिली.