Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी महापालिकेने झटकली

सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची जबाबदारी महापालिकेने झटकली

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:46AMमुंबई : प्रतिानिधी 

गिरगांव चौपाटीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा आग्रह भाजपाने धरला आहे. तसा प्रस्तावही महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. पण पालिकेने पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करा, असा अभिप्राय देत, आपली जबाबदारी झटकली. त्यामुळे भाजपामध्ये नाराजीचे सूर आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या राजकीय एकसंधीकरणात मोठे योगदान दिले. भारतातील 565 अर्धस्वायत संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य आहे. त्यांचे योगदान लक्षात घेऊन, पालिकेने सरदार पटेल यांचा गिरगाव चौपाटीवर पुर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी माजी उपमहापौर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक डॉ. राम बारोट यांनी केली आहे. याबाबतचा ठराव 15 जानेवारी 2018 रोजी पालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. यावर पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आपला अभिप्राय दिला आहे. या अभिप्रायमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचा दाखल देत, पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी पुतळा उभारण्या संबधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक असल्याचे कळवले आहे.

गिरगाव चौपाटी ही जिल्हाधिकारी मुंबई यांच्या अखत्यारित येत असल्याने पुतळा उभारण्यासाठी त्यांची अनुमती असणे आवश्यक आहे. तसेच हायकोर्टाने गठीत केलेल्या उच्चाधिकार समिती यांची ना हरकत घेणे अनिवार्य असल्याचेही  अभिप्रायमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान याअगोदर पालिका सभागृहात पुतळ्यासंदर्भात मंजूर झालेले अनेक ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मग सरदार पटेलांच्या पुतळ्याचा प्रस्ताव का पाठवण्यात आला नाही, असा सवाल भाजपा नगरसेवकांनी केला आहे.