Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओशिवरा मॅटर्निटी होमच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाला गमवावे लागले प्राण

ओशिवरा मॅटर्निटी होमच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाला गमवावे लागले प्राण

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:40AMमुंबई : प्रतिनिधी

जोगेश्‍वरी पश्‍चिमेला असलेल्या पालिकेच्या ओशिवरा मॅटर्निटी होमच्या हलगर्जीपणामुळे एका नवजात बालकाला आपला प्राण गमवावा लागला. रुग्णालयाचा हलगर्जीपणा, अपुरा स्टाफ बालकाच्या मृत्यूला  जबाबदार असल्याचा आरोप बालकाच्या नातेवाइकांनी केला आहे.  ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये असणार्‍या संबंधित अधिकारी व डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करीत रुग्णालयातील प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते जगदीश शर्मा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 

आदर्श नगर, ओशिवरा येथे राहणार्‍या 30 वर्षीय निखत मलिक या महिलेचे नाव ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये प्रसूतीसाठी नोंदवण्यात आले होते. निखत हिची नियमित आरोग्य तपासणी इथे होत होती. आणि त्यात बाळ सुदृढ असल्याचेही दिसत होते. 10 फेब्रुवारी रोजी निखतची तपासणी करण्यात आली तेव्हा तिला दोन-तीन दिवसात प्रसूती होईल असे सांगण्यात आले. मात्र 12 फेब्रुवारीला निखतला प्रचंड प्रसूती वेदनांसह रक्तप्रवाह होऊ लागल्याने तिला ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर तब्बल 20 मिनिटे उशिरा आले, तोपर्यंत बाळाचे पल्स रेट कमी झाले होते. 

रुग्णालयात कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला गेला. तोपर्यंत निखतच्या शरीरातून बरेच रक्त वाहून गेले, ज्या रुग्णवाहिकेने निखतला कूपरमध्ये नेण्यात आले, त्या रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नव्हते. कूपरमध्ये दीड तासानंतर ऑपरेशन करुन बाळाला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत बाळ मृत्यू पावले होते, असे रुग्णाचे नातेवाईक अरिफ यांनी सांगितले.