Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापालिकेचे चार अधिकारी निलंबित !

महापालिकेचे चार अधिकारी निलंबित !

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

जोगेश्वरी पूर्वेकडील मनोरंजन मैदान, हॉस्पिटल व रस्त्यासाठी राखीव असलेला सुमारे 500 कोटी रुपयांचा भूखंड अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मुंबई महापालिकेला गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या शेर्‍यात खाडाखोड करणे, भूखंड मालकाला अप्रत्यक्षरीत्या मदत करणे, असा ठपका ठेवत, कार्यकारी अभियंत्यासह उप कायदा अधिकारी व अन्य दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर 18 अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात एका मुख्य अभियंत्याचा समावेश आहे. 

जोगेश्वरी येथील मोक्याचा भूखंड विधी व विकास नियोजन विभागातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पालिकेला गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांची नियुक्ती केली होती. चौधरी यांनी आपला अहवाल गेल्या आठवड्यात आयुक्तांना सादर केला. हा अहवाल आयुक्तांनी सोमवारी रात्री उशिरा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. या चौकशी अहवालात चार अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली, तर 18 जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचे सुचवले आहे.

यात मुख्य अभियंता संजय दराडे, प्रमुख कायदा अधिकारी (निवृत्त) नासिर शेख व उज्वला देशपांडेव विद्यमान कायदा अधिकारी जेरनॉल्ड झेविअर्स यांचा समावेश आहे. दरम्यान चौकशीचा हा प्राथमिक अहवाल असून येत्या 15 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.त्यामुळे अजून काही अधिकारी या भूखंड घोटाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.