होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद

मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 1:46AMठाणे : प्रतिनिधी 

मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरूस्तीला अखेर मंगळवारी सकाळी मुहूर्त मिळाला या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा त्रास  ठाणे तसेच नवी मुंबई  वाहनचालकांना  सहन करावा लागला. सकाळी 11.30 च्या दरम्यान मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्यानंतर इतर ठिकाणी फारशी वाहतूक कोंडी झाली नसली तरी, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर याचा परिणाम दिसून आला.  ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील आनंदनगर टोल नाक्यावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळाली. 

वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आनंदनगर टोल नाका येथे अतिरिक्त लेन सुरु करण्यात आली. मात्र ही लेन उशिरा सुरु झाल्याने याठिकाणी चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळी देखील याठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यापुढे दोन महिने दुरुस्तीचे काम सुरु राहणार असल्याने या कालावधीत वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मुंब्रा बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या महामार्गावरील अपघाताचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे राज्य शासनाने या मार्गाच्या दुरूस्तीचा निर्णय घेतला. पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुढील दोन महिने या मार्गाचे दिवस  रात्र काम केले जाणार आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 
 

बायपास दुरूस्तीमुळे नाशिककडे जाणारी वाहने शहापूर आणि शीळ, कल्याण फाटा मार्गे वळवण्यात आली आहे. तर अहमदाबाद येथे घोडबंदर मार्गे जाणारी वाहने ऐरोली पूल, मुलुंड जकातनाका मार्गे रात्रीच्या वेळी वळवण्यात आली आहेत. सोमवारी मध्यरात्री  पासून मुंब्रा बायपास महामार्ग बंद करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम मंगळवारी  सकाळी मुंबईकडे जाणार्‍या वाहतुकीवर झाला.

 आनंदनगर चेकनाका, कोपरी पूल, नवी मुंबईतील पावणा नाका, खारेगाव टोलनाका आणि शिळफाटा येथे सकाळी आणि संध्याकाळी वाहतूककोंडी झाली होती. ठाण्यात नितीन कंपनी ते आनंदनगर जकातनाका या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच खारेगाव टोलनाका ते मानकोलीनाका दरम्यानही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी ही वाहतूक सुरळीत झाली असतानाच सायंकाळी त्याच ठिकाणी वाहतूककोंडीचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. मुंब्रा बायपास महामार्ग दुरूस्तीकरिता बंद ठेवण्यात आल्याची साधी कल्पना वाहतूक शाखेतील पोलीस शिपायांनाही नव्हती. तर परराज्यातून येणार्‍या वाहनचालकांना देखील याची कल्पना नसल्याने  वाहतुकीचे नियोजन करताना  वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

नाशिकवरून येणार्‍या ट्रक चालकांना पर्यायी मार्ग माहिती नसल्याने त्यांनी खारेगांव टोल नाका येथे आपल्या गाड्या लावून बराच वेळ उभे होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून पुरेशी माहिती वाहनचालकांना देण्यात आली नसल्याचेही काही वाहनचालकांचे म्हणणे होते. पहिलाच दिवस असल्याने काही प्रमाणात नियोजन व्यवस्थित झाले नसले तरी, दुसर्‍या दिवसापासून वाहतुकीचे चोख नियोजन केले जाईल असे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे. मात्र, ज्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल अशी अपेक्षा करण्यात आली  तेवढ्या प्रमाणात मात्र वाहतूक कोंडी झाली नाही. वाहतूक शाखेने पर्यायी मार्गाचे जागोजागी फलक लावले आहेत. त्याचा वापर वाहनचालकांनी करून वाहतूक कोंडीतून सुखकर प्रवास करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Mumbra, bypass closed, two months,