Wed, Apr 24, 2019 16:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंब्रा-कौसा बायपास ७ मेपासून बंद

मुंब्रा-कौसा बायपास ७ मेपासून बंद

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 07 2018 1:24AMठाणे : प्रतिनिधी

मुंब्रा-कौसा बायपास रस्त्याच्या पारसिक पुलाची दुरुस्ती तसेच इतर आवश्यक दुरुस्तीचे काम दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता या कामास मुहूर्त मिळाला असून 7 मे पासून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणारी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी शनिवारी रात्री जारी केली. 

पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण प्रशांत कदम यांच्याकडून मुरबाड-शहापूर पर्यायी मार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग करावा लागत असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही अधिसूचना काढण्यात आली. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी यापूर्वीच वाहतूक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

रमजान महिन्यातच मुंब्य्राची वाहतूक कोंडी

काही दिवसानंतर रमजान महिना सुरू होत असून  त्याच काळात मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येत आहे. परिणामी मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत. ही कोंडी टाळण्यासाठी किमान एकेरी वाहतूक सुरू ठेवावी, अशी मागणी मुंब्रा रहिवाशांनी केली आहे.

वाहतुकीत बदल

भिवंडीकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे जाणार्‍या जड अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे जाण्यास बंदी नाशिक जिल्ह्याकडून येणारी वाहतूक आता शहापूर अंडरपास समोरून डाव्या बाजूने शहापूर-शेणवा-किन्हवली-सरळगाव-मुरबाड-कर्जत-चौक फाटा-येथून जाईल. हा रस्ता केवळ शहापूरकडून मुरबाडकडे या एकेरी वाहतुकीसाठी पावसाळा सुरू होईपर्यंत चालू राहणार आहे.

रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत टेन नाका वसईमार्गे वाकोडा टोल प्लाझा - वाडा खंडेश्वरी नाका या ठिकाणी उजवीकडे वळण घेऊन पुढे कवाड टोल नाका - नदी नाका ब्रिजवरून डावीकडे वळण घेऊन चाविंद्रा-वडापा-मुंबई-नाशिक हायवे वरून पुढे येवई नाक्यावर डावीकडे वळण घेऊन पाईप लाईनमार्गे गांधारी ब्रिजवरून आधारवाडी सर्कल अशी वाहने जातील. वर्सोवा मार्गे जेएनपीटी नवी मुंबई तसेच दक्षिण भारतात जाणार्‍या जड अवजड वाहनांना घोडबंदर रोड-कापुरबावडी-कोपरी ब्रिज - मुलुंड चेक नका - ऐरोली मार्गे जावे लागेल.

Tags : Mumbai, mumbai news, Mumbra-Kausa Bypass, closed, 7th May,