Fri, May 29, 2020 03:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : स्थानिक विरुद्ध उपरे वाद पेटणार

ठाणे : स्थानिक विरुद्ध उपरे वाद पेटणार

Published On: Sep 18 2019 2:36PM | Last Updated: Sep 18 2019 2:11PM

कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात लागले 'हाकलून लावा उपऱ्याला बॅनर'ठाणे : प्रतिनिधी

कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विकासाचे फलक मागील काही दिवसांपासून कळवा खाडी पूल येथे नागरिकांना पहावयास मिळत आहेत. परंतु, आता आगरी सेनेच्यावतीने कळवा पारसिक नगर येथील बस स्टॉप तसेच रस्त्याच्या खांबावर 'आधी साहेब, नंतर लोकनायक, आता खलनायक, हाकलून लावा या उपऱ्याला' तसेच 'चुनाव के दिन मंदिर मे बजाव घंटी और बोलो हमे, नही चाहीये बबली और बंटी, लोकांचा एकच आवाज भूमिपुत्र आमदार' असे बॅनर आगरी सेनेच्यावतीने मंगळवारी रात्री कळव्यात लावण्यात आले आहेत. यामुळे आता कळवा परिसरात उपरे म्हणजे कामानिमित्त कळवा येथे कायमचे घर घेऊन राहणारे नागरिक आणि आगरी भूमिपुत्र वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. आगरी सेनेने त्यांना उल्लेखूनच असे बॅनर लावले असल्याची चर्चा कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात सुरू झाली आहे. यामुळे आमदार आव्हाडांना मानणारी जनता असे फलक पाहून आगरी सेनेवर नाराज झाली आहे. या विधानसभा क्षेत्रात ८० टक्के नागरिक बाहेरून येऊन याठिकाणी घर घेऊन राहत आहेत. तर २० टक्के नागरिक स्थानिक भूमिपुत्र आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच विरोधाचे बॅनर कळवा परिसरात लागल्याने हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.