होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचा पाऊस आता मोबाईलवर

मुंबईचा पाऊस आता मोबाईलवर

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी 

26 जुलै, 2005सारखा जलप्रलय झेललेल्या मुंबईकरांसाठी एक खूशखबर आहे. केंद्रीय पृथ्वीविज्ञान खात्याने पुणे वेधशाळेसह मुंबई महापालिकेला मुंबई शहरात विविध ठिकाणी पावसाचे मोजमाप करणारी 200 ते 250 सयंत्रे (ऑटोमॅटिक रेन गेज- एआरजी)जूनपूर्वी बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्या भागात किती पाऊस पडत आहे, याचे अपडेट्स दर पंधरा ते तीस मिनिटांत मुंबईकरांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मुंबईत रडार बसवण्याच्या हालचालीही सुरू असून नागरिकांना त्याचाही मोठा फायदा होणार आहे. एखाद्या महानगरात राबवण्यात येणारा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. 

शहरात उभारण्यात येणारे पर्जन्यमापक सयंत्रांचे नेटवर्क व रडारच्या सहाय्याने अवकाशासंबंधीचा तत्कालीक नकाशा तयार करण्यात येणार असून त्याला मोबाइल प्लॅटफॉर्मची जोड देण्यात येणार आहे. साहजिकच ही सुविधा मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने त्याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याची माहिती पृथ्वीविज्ञान खात्याचे सचिव एम. राजीवन यांनी दिली आहे. 

पर्जन्यमापनासाठी मुंबईत सांताक्रूझ व कुलाबा या दोन ठिकाणी बसवण्यात आलेली सयंत्रे(एआरजी) सद्या कार्यरत आहेत.2005 मध्ये झालेल्या पावसाच्या हाहाकारानंतर मुंबई महापालिकेनेही शहरात पर्जन्यमापके बसवली आहेत. मात्र, देशातील शहरांची होणारी बेसुमार वाढ व क्षेत्र पाहाता वेधशाळेकडून ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स (एडब्ल्यूजी)बसवणे अशक्यप्राय होऊन राहिले आहे. त्याचा मोठा त्रास जनतेला भोगावा लागत आहे. मात्र, पृथ्वीविज्ञान खात्याने पर्जन्यमापकाच्या(एआरजी) उभारणीचे काम वेधशाळा व महापालिकेवर सोपवल्याने आता नागरिकांना शहरातील पावसाच्या पाण्याची सद्यस्थिती अगोदरच माहीत होणार आहे. पृथ्वीविज्ञान खात्याकडून शहरातील पावसाबरोबरच समुद्राची भरती, डे्रनेज सिस्टीम आदी बाबींवरही विचार करण्यात येत आहे.     

Tags : Mumbai,  rain updates,  now on mobile, Mumbai news,