कोल्हापूर : प्रतिनिधी
सहलीसाठी गावी आलेल्या रोशन शंकर फाटक (वय 39, रा. मीठबाव, देवगड, सिंधुदुर्ग) या पोलीस कर्मचार्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी राधानगरी तालुक्यातील चांदे कोतेपैकी आणेवाडी गावात ही घटना घडली. ते सध्या मुंबईतील व्ही. टी. पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते.
रोशन फाटक हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मीठबाव गावचे राहणारा आहेत. होळीची सुट्टी असल्याने ते दोन दिवसांपूर्वी गावी आले होते. शनिवारी गावातील मित्रांसोबत राधानगरी तालुक्यातील आणेवाडी येथील मित्राच्या फार्महाऊसवर ते आले होते. रविवारी सर्व जण परत जाण्याच्या तयारीत होते. गाडीजवळ आल्यानंतर रोशन यांना अस्वस्थ वाटू लागले. ते चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांच्या मित्रांनी त्यांना उचलून राधानगरीतील खासगी रुग्णालयात नेले; पण प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय इस्पितळात (सीपीआर) आणण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रोशन यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.