Sat, Jul 20, 2019 02:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदेशी तरुणांनी उभारले मुंबईतील पहिले महिला स्वच्छतागृह

विदेशी तरुणांनी उभारले मुंबईतील पहिले महिला स्वच्छतागृह

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:11AMमुंबई : प्रतिनिधी

कुणी कुठल्याश्या प्रकरणातील दोषी आरोपी.. कुणी एकेकाळी अमली पदार्थांच्या आहारी गेलेला... सगळे नॉर्वेतून आलेले. ऐकायला नवल वाटेल पण या तरुणांच्या चमूनेच उभारलंयमुंबईत खास महिलांसाठी सुरू झालेलं पहिलं स्वच्छतागृह.

मुंबई सेंट्रल येथील या अभिनव स्वच्छतागृहाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. पण त्याला हातभार लागला तो प्रवाहापासून कधीकाळी दूर गेलेल्या, वाट चुकलेल्या आणि पुन्हा मुख्य प्रवाहात आलेल्या विदेशी तरुण आणि तरुणींचा. या उपक्रमाला आर्थिक पाठबळ दिलं ते नॉर्वेतीलच बीआयटीआर ही स्वयंसेवी संस्था, समाटेक ही सॅनिटेशन कंपनी आणि जेएसडब्ल्यू समूहाने. ज्यावेळी या स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू होते तेव्हा हे सगळे ग्रँट रोडच्या रेड लाईट भागात राहत होते. या तरुणांतील बहुतेकांना सुरुवातीला अतिसाराची लागण झाली. काहींची प्रचंड दमछाकही झाली. एकाला तर निमोनियानेही ग्रासले. मात्र तरीही आम्ही काम सुरूच ठेवलं. आमच्यापैकी प्रत्येकजण सकाळी 10 वाजता बांधकामाच्या ठिकाणी जात होता आणि संध्याकाळी 5 वाजता परत येत होता, असे या तरुणांच्या गटाचा प्रमुख अलेक्झांडर मेदिन सांगतो. या प्रकल्पाकडे बड्या कंपन्या आणि राजकारण्यांचे लक्ष वेधले जाईल आणि ते अशा कामांसाठी निधी वळता करतील, अशी आशा त्याला वाटते. हा प्रकल्प एक उदाहरण ठरावा, अशी त्याची अपेक्षा आहेे. नॉर्वेतून आलेले आणि एकेकाळी ड्रग्जच्या आहारी गेलेले तरुण आपला वेळ, पैसा आणि ऊर्जा, ज्यांना आपण ओळखतही नाही, अशा लोकांसाठी खर्च क़रून अशा प्रकारचा प्रकल्प उभारू शकतात तर याचा खूप मोठा परिणाम घडू शकतो, अशी आशा तो व्यक्‍त करतो. शुक्रवारी मुंबईतील पहिल्यावहिल्या खास महिलांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्वच्छतागृहांत बालकांसाठीही विशेष सुविधा देण्यात आली आहे. स्वच्छतागृह सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. वापरासाठी प्रति महिला 5 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.