Tue, Jul 16, 2019 01:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील विकास कामांचा दर्जा घसरला !

मुंबईतील विकास कामांचा दर्जा घसरला !

Published On: Dec 13 2017 2:30AM | Last Updated: Dec 13 2017 2:01AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील विशेषत: विभागपातळीवर नगरसेवक व प्रभाग समिती निधीतून करण्यात येणार्‍या विकास कामांचा दर्जा घसरला आहे. कंत्राटदार व अधिकार्‍यांमध्ये अर्थकारण दडले असल्यामुळे 55 टक्के कमी दराने निविदा भरलेल्या कंत्राटदाराला कामे देण्यात येत आहेत. त्यामुळे यात करोडो रुपयाचा घोटाळा होत असून यात काही नगरसेवकही सामिल असल्याचे बोलले जात आहे.  

नगरसेवक निधीतून करण्यात येणार्‍या विकास कामांसाठी सीडब्लूसी कंत्राटपद्धती बंद करून ई-निविदा पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. ई-निविदा पद्धतीचा वापर करत कारभारात पारदर्शकता आणण्याचा बढाया मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात ई-निविदेत मोठा घोटाळा होत असल्याचे समोर येत आहे. नगरसेवकांच्या निधीतून पायवाटा, शौचालयांची दुरुस्ती, पेव्हरब्लॉक आदीप्रकारची विकासाची कामे करण्यात येतात. 

यापूर्वी महापालिकेने दोन ते तीन नगरसेवकांच्या प्रभागांसाठी एक याप्रमाणे 232 नगरसेवकांसाठी सीडब्लूसी कंत्राटदाराची निवड केली जायची. परंतु या सीडब्लूसी कंत्राटदारांशी नगरसेवकांचे संगनमत असल्याचे आरोप ठेवत प्रशासनाने ही पद्धती बंद केली. याऐवजी ई-निविदा पद्धतीचा अवलंब करून प्रत्येक काम 3 लाखांच्या आतच करण्याच्या अटी घातल्या आहेत. मात्र ई-निविदा पद्धतीचा अवलंब केल्यापासून नगरसेवकांच्या  निधीतून योग्यप्रकारे कामे केली जात नसून त्यासाठी तरतूद केलेल्या निधीचाही पूर्णपणे वापर केला जात नाही. 

विशेष म्हणजे या ई-निविदांमध्येही काही कंत्राटदारांना हाताशी धरून नगरसेवक कामे करत आहे. यामध्ये प्रशासनाने निश्चित केलेल्या अंदाजित खर्चापेक्षा प्रत्यक्षात कंत्राटासाठी 55 ते 60 टक्के एवढी कमीची बोली लावत ही कामे मिळवली जात आहेत. परंतु ही कंत्राटे मिळवल्यानंतर कंत्राटदार दर्जाहिन कामे करत आपल्या कामांचा मोबदला घेऊन मोकळा होतो. पण प्रत्यक्षात केलेली ही कामेच योग्यप्रकारची नसल्यामुळे या विकासकामांसाठी केलेला सर्वच पैसा वाया जात असल्याची बाब समोर येत आहे.