होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडले

मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडले

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई शहर व उपनगरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. शनिवारी पहाटे पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. ठाणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली. हार्बर मार्गावरील लोकलही 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावत होत्या. पश्‍चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा वेळापत्रकानुसार सुरू होती. पावसामुळे गाड्यांचा वेग मंदावला होता. त्यामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

मुंबईत सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी, रिपरिप कायम आहे. शनिवारी सकाळी काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्यामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. पण समुद्राला भरती नसल्यामुळे पाण्याचा तातडीने निचरा झाला. पावसामुळे वातावरण धुरकट झाले होते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला. परिणामी पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, एस. व्ही. रोड, सायन ते लालबाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, महम्मद अली रोड, लालबाग व जे जे. उड्डाणपूल एल. बी. एस. मार्ग, अंधेरी-कुर्ला रोड, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आदी प्रमुख रस्त्यांसह काळबादेवी, धारावी, दादर, माहिम, सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कुर्ला आदी भागातील लहान रस्त्यावरही वाहनांची गर्दी झाली होती. 

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर आदी भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाडीचे वेळापत्रकच कोलमडले. सुमारे 30 ते 40 मिनिटे विलंबाने धावणार्‍या लोकलमुळे प्रवाशांची स्टेशनवर गर्दी झाली होती.

शहर व उपनगरात ठिकाठिकाणी झाडे पडल्यामुळे काही रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. चेंबूर येथे सायंकाळी एसआरए इमारतीचा पाया खचला. सेना भवन रोड दादर येथे मेट्रो रेल्वे कामामुळे 18 इंचाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे हजारो लिटर्स पाणी वाया गेले. दरम्यान जलवाहिनी दुरूस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.