Tue, Apr 23, 2019 02:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणीबागेत जन्मला ‘मुंबईकर’ पेंग्विन!

राणीबागेत जन्मला ‘मुंबईकर’ पेंग्विन!

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMमुंबई : प्रतिनिधी

भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विनने पिलाला जन्म दिला असून, भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाला आहे. 

स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी 8:02 मिनिटांनी हा पेंग्विन जन्माला आला.  बाळ अगदी सुखरुप असून आई-बाबा त्याची विशेष काळजी घेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिल्लू सुखरुप बाहेर पडल्याने आई फ्लिपर आणि बाबा मोल्ट देखील खूश आहेत. आई फ्लिपरने तर त्याला पाजण्याचा प्रयत्न देखील केल्याची माहिती राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांपूर्वी 26 जुलै 2016 रोजी आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. यामध्ये तीन नर व पाच मादी पेंग्विन होते. त्यापैकी 18 ऑक्टोबर 016 रोजी डोरी या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला. यानंतर सर्वांत कमी वयाचा असलेला तीन वर्षीय मोल्टकडून पाच वर्षीय फ्लिपरने 5 जुलैला एक अंडे दिले. या पेंग्विनच्या पिलाचा जन्म सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात होती. पेंग्विनचे आवडते बोंबील, ईल, रावस, बांगडा व तारली या माशांमधून सप्लिमेंट आणि कॅल्शियम दिले जात होते. हे सर्व प्रयत्न अखेर फळाला आले.