Thu, Jun 20, 2019 00:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन !

मुंबईकरांना पाण्याचे नो टेन्शन !

Published On: Mar 11 2018 1:52AM | Last Updated: Mar 11 2018 1:49AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

उन्हाचा पारा चढत असताना, राज्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पण यंदाचा उन्हाळा मुंबईकरांसाठी पाण्याच्या बाबतीत सुखाचा जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सर्वच तलावांत मुबलक पाणीसाठा असल्यामुळे मुंबईकरांची पाणीटंचाईपासून सुटका होणार आहे. 

उन्हाळा जवळ आला की, उकाड्याने त्रस्त होणार्‍या नागरिकांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागतो. राज्याच्या ग्रामीण भागातील विहिरी व नद्या आटू लागल्या असून काही भागांत पाण्याची मोठी  टंचाई भासू लागली आहे. पण मुंबईकर मात्र पाण्याच्या बाबतीत नेहमीच सुखी असतो. 2017 मध्ये तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे यंदा तलावांतील पाणीसाठा मुबलक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोडक सागर, भातसा, तानसा, अप्पर वैतरणा व मध्य वैतरणा या प्रमुख तलावांत पाण्याचा मुबलक साठा आहे. तर उपनगरांतील नॅशनल पार्कमधील तुळसी व विहार तलावांतही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याचा साठा जास्त आहे. 

सध्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 7 लाख 27 हजार 601 दशलक्ष लिटर्स पाणीसाठा आहे. 2017 मध्ये हाच साठा 7 लाख 22 हजार दशलक्ष लिटर्स इतका होता. यात सर्वाधिक पाणीसाठा भातसा तलावात 3 लाख 41 हजार दशलक्ष लिटर्स तर मध्य वैतरणा तलावात 1 लाख 50 हजार दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याचा पाणीसाठा हा मुंबई शहराला किमान सहा महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. याला पालिकेच्या जलअभियंता विभागाने दुजोरा दिला आहे. तलावांत मुबलक पाणीसाठा असल्यामुळे यंदा पाणीकपातीची आवश्यकता भासणार नसल्याचा विश्वास जलअभियंता विभागाच्या वरिष्ठ अभियंत्याने व्यक्त केला.