Wed, Mar 27, 2019 05:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयसीएसईवर मुंबईचा झेंडा!

आयसीएसईवर मुंबईचा झेंडा!

Published On: May 15 2018 1:40AM | Last Updated: May 15 2018 1:35AMमुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी

आयसीएसई बोर्डात यंदा मुंबईने बाजी मारली आहे. बारावीत एकूण पाच तर दहावीत एकूण सात मुंबईकर विद्यार्थी देशात पहिल्या तीन क्रमांकावर चमकले आहेत. ठाण्याची एक विद्याथिर्र्नी बारावीत तिसरी तर पुण्याच्या एका विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सांताक्रूझ येथील लीलावतीबाई पोदार शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत.  दहावी, बारावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. दोन्ही परीक्षेत 64 टक्के विद्यार्थ्यांनी 99 टक्के गुण पटकाविले आहेत.

बारावीच्या परीक्षेत लीलावतीबाई पोदार शाळेचा अभिज्ञान चक्रवर्ती हा विद्यार्थी आणि कॅथेड्रल अँड  जॉन कॉनन शाळेची तानसा कार्तिक शाह ही विद्यार्थिनी 99.50 टक्के गुण मिळवून बोर्डात देशात पहिली आली आहे. एकूण 7 विद्यार्थ्यांना 99.50 टक्के गुण मिळाले आहेत, त्यापैकी हे दोन विद्यार्थी मुंबईचे आहेत. दहावीतही नवी मुंबईच्या सेंट मेरी शाळेचा विद्यार्थी स्वयम दास याने 99.40 टक्के मिळवून देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. 

जुहूच्या जमनाबाई नरसी शाळेची विद्यार्थिनी अनोखी अमित मेहता (99.20 टक्के) दुसरी तर गोरेगावच्या विबग्योर शाळेची निधी नीलेश धनानी (99 टक्के) तिसरी आली आहे. विबग्योरचीच विश्रुती शाह, बॉम्बे स्कॉटिशची सारंथा कोरिआ, लीलावतीबाई पोदार शाळेचा सार्थक मित्तल आणि सेंट ग्रेगोरियस हायस्कूलची वेदिका माणेक या विद्यार्थ्यांनीही दहावीत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

आयसीएसई बारावी ठाण्याची रेवती देशात तिसरीठाणे

: ठाण्याच्या सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी असलेली रेवती शितोळे आयसीएसई परीक्षेत 12 वीमध्ये देशात तिसरी आली आहे. तिच्या या यशामुळे अभिनंदचा वर्षाव होत आहे.  सोमवारी दुपारी आयसीएसई बोर्डाचा  इंटरनेटवर  निकाल जाहीर झाल्यानंतर आपण देशात तिसर्‍या क्रमांकावर आलो असल्याचे तिने पहिल्यानंतर तिला आनंदाचा सुखद धक्का बसला. तब्बल 99 टक्के गुण मिळवून रेवती ही देशात तिसर्‍या क्रमांकावर आली आहे. निकाल कळताच रेवतीच्या आई-वडिलांनी शाळेत धाव घेऊन रेवतीचे अभिनंदन केले. भास्कर कॉलनी परिसरात राहणारे  रेवतीचे वडील भरत शितोळे हे रायगडचे उपजिल्हाधिकारी असून आपल्या मुलीचे यश शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रेवती अभ्यासाबरोबर सर्व इतर सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेत होती.