Sun, May 26, 2019 10:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रोकामांमुळे पावसात मुंबई तुंबणार ?

मेट्रोकामांमुळे पावसात मुंबई तुंबणार ?

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:47AMतुंबई मेट्रो?
- बांधकामामुळे फुटलेल्या पर्जन्य जलवाहिन्या आणि मॅनहोल्स
- पाण्याच्या प्रवेशाची आणि बाहेर पडण्याची तुंबलेली ठिकाणे
- एकमेकांपासून तुटलेल्या पर्जन्य जलवाहिन्या
- रस्त्यांच्या बाजूला पडलेल्या ढिगार्‍यांमुळे प्रवाहाला  निर्माण झालेले अडथळे
- खांब उभारण्याच्या कामांमुळे जलवाहिन्यांचे झालेले नुकसान.
- बांधकाम साहित्याच्या ढिगार्‍यांमुळे मॅनहोलमध्ये प्रवेश करण्यास सांडपाण्याला येत असलेले अडथळे.

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शहरात सुरु असलेल्या मुंबई मेट्रोच्या कामांमुळे ऐन पावसाळ्यात मुंबई कोलमडण्याची भीती आहे. मेट्रोच्या कामांमुळे पर्जन्यजलाचा निचरा करणार्‍या वाहिन्या, इतर वाहिन्या आणि मॅनहोल यांचे पंचेचाळीस ठिकाणी नुकसान झाले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात पावसाचे पाणी वाहून जाण्यात मोठे अडथळे येण्याची आणि गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

महापालिकेने अशा ठिकाणांची यादीच मेट्रोच्या बांधकाम कंपनीला सादर केली असून, तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर ही यादी देण्यात आली. मान्सूनचे आगमन अवघ्या तीन आठवड्यांवर आले असून, त्यामुळे महापालिकेची लगबग सुरु झाली आहे. 

आम्ही एप्रिल महिन्यात तसेच मेच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोच्या बांधकाम स्थळांना भेट दिली आहे. सांडपाण्याच्या समस्येशिवाय अनेक ठिकाणी पाण्यासाठी अधिक एंट्री आणि एक्झिट पॉईंट्सची आवश्यकता आहे. तसेच काही ठिकाणी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप्सची आवश्यकता आहे, असे महापालिकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले.