होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांचे पाणी महागले

मुंबईकरांचे पाणी महागले

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी 

प्रशासकीय खर्चासह आस्थापना व विद्युतखर्च वाढल्यामुळे पालिकेने पाणीपट्टीत 3.72 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी शनिवार 16 जूनपासून करण्यात येणार असून यावर गुरुवारी स्थायी समितीत शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे घरगुती पाणीपट्टीत प्रति 1 हजार लिटर्समागे 4 रुपये 91 पैशांवरून 5 रुपये 9 पैसे वाढ होणार आहे. त्याशिवाय यावर 70 टक्के मलनि:सारण शुल्क भरावे लागणार आहे. 

जल विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, शासकीय धरणातून घेतलेल्या पाण्याचे शुल्क, विद्युत खर्च व अन्य मेन्टेनन्सचा खर्च वाढल्यास पालिका प्रशासनाला 8 टक्केपर्यंत पाणीपट्टी वाढवण्याचा अधिकार पाच वर्षापूर्वी देण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी खर्चाचा अंदाज लक्षात घेऊन पाणीपट्टीत वाढ करण्यात येते. 2016-17 या वर्षाच्या तुलनेत 2017-18 मध्ये सुमारे 30 कोटी रुपयांनी खर्च वाढला. गेल्या वर्षी 806 कोटी 56 लाख रुपये इतका खर्च आला होता. यावेळी तोच खर्च 836 कोटी 60 लाख रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे पालिकेने पाणीपट्टीत 3.72 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मलनि:सारण शुल्कात कोणतीही वाढ न सुचवल्यामुळे पूर्वीप्रमाणे 70 टक्के मलनि:सारण शुल्क ग्राहकांना भरावे लागणार आहे. पाणीपट्टी वाढीमुळे शीतपेय व बाटलीबंद पाणी कंपन्यांना सुमारे 4 रुपये जादा दराने पाणीपट्टी भरावी लागणार आहे.