Sun, Aug 18, 2019 21:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन मुलींसाठी मुंंबई अजूनही असुरक्षित!

अल्पवयीन मुलींसाठी मुंंबई अजूनही असुरक्षित!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना जवळपास रोज घडत असतात. मात्र अलिकडे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. प्रजा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने माहिती अधिकारात मिळवलेल्या 2016 सालातील माहितीत धक्‍कादायक आकडेवारी समोर आली आहे.  यावर्षी मुंबईत घडलेल्या बलात्कारांच्या घटनांतील 72 टक्के पीडिता अल्पवयीन आहेत. 2015 च्या तुलनेत हे प्रमाण 63 टक्क्यांनी वाढले आहे. 

2016 साली मुंबई शहरात बलात्काराच्या 628 घटनांची नोंद झाली. यातील 455 प्रकरणांत पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 2015 साली शहरात बलात्काराची  712 प्रकरणे नोंदवली गेली. त्यातील 448 पीडित मुली या अल्पवयीन होत्या. प्रजा फाऊंडेशनच्या सदस्या वैष्णवी माहूरकर यांनी यासंदर्भात चिंता व्यक्‍त केली आहे. 

प्रजा फाऊंडेशनने घेतलेल्या महितीत शहरातील इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 2016 साली मुंबई शहरात खुनाचे 141 घटना घडल्या. 2015 साली हेच प्रमाण 170 इतके होते. घरफोडी आणि चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यांतही घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

प्रजा फाऊंडेशनने मुंबई पोलिसांकडून 2008 ते 2012 या कालावधीत झालेल्या दोषारोप निश्‍चितीच्या प्रमाणावरही वेगळा अहवाल दिला आहे. 2012 साली दोषारोप निश्‍चितचे प्रमाण 18 टक्के इतक्या चिंताजनक पातळीवर आले होते. 2016 साली हे  प्रमाण 45 टक्क्यांपर्यंत आले असले तरी ते समाधानकारक नाही, असे फाऊंडेशनच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त निताई मेहता यांनी सांगितले. एखाद्या गुन्ह्याचा प्राथमिक माहिती अहवाल ते आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतचा प्रवास, सरासरी 11.6 महिन्यांचा असतो, असे अहवालात निदर्शनास आले आहे. 

2016 साली शहरात 2 लाख 21 हजार 412 खटले प्रलंबित आहेत. 13 हजार 544 खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली आहे. यातील 6 हजार 120 खटल्यांत दोषारोप निश्‍चित झाले आहेत. बलात्काराचा गुन्हा प्राथमिक माहिती अहवालापासून निकालापर्यंत पोहोचण्यास सरासरी 21.3 महिने लागतात तर खुनाच्या गुन्ह्यात हा कालावधी 24.7 महिन्यांचा आहे, असे मेहता म्हणतात.

बलात्कार आणि खून अशा गुन्ह्यांत आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. खुनाच्या 244 खटल्यांत 60 जण दोषी ठरले आहेत. बलात्काराच्या 300 प्रकरणांत 54 जणांवर आरोप सिद्ध झाले आहेत.माहूरकर यांच्या मते, बलात्काराच्या गुन्ह्यांत तक्रारदार तक्रार मागे घेत असल्याने आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण कमी आहे. मुंबई शहराला पोलिसांची 50 हजार 465 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 41 हजार 955 पदांवरच कर्मचारी कार्यरत आहेत.


  •