होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आभार सभेत उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत

आभार सभेत उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत

Published On: Jun 08 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 1:33AMतलासरी : सुरेश वळवी

सध्या सुरू आहेत ती नाटके, पूर्ण पिक्‍चर अजून बाकीच आहे, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बुधवारी झालेल्या मातोश्री भेटीनंतर दुसर्‍याच दिवशी पालघरातील तलासरीच्या कवाडा येथील माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या निवासस्थानी घेतलेल्या आभार सभेत उद्धव यांनी भाजपवर कुणाचेही नाव न घेता कडाडून टीका केली. 

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाल्याबद्दल उद्धव यांनी मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी 2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना खासदार करण्याचा निर्धार व्यक्‍त केला. मात्र आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी युतीबाबत कोणतेही भाष्य केले नाही. 

ते म्हणाले, पालघरची लोकसभेची निवडणूक शिवसेना पहिल्यांदा लढली असली तरी शिवसेना घराघरात पोहोचली आहे. पालघर निवडणुकीतील पराभव  खिलाडू वृत्तीने नाही आणि कोणत्याच परीने मान्य करायला मी तयार नाही. श्रीनिवास वनगा यांच्या भाषणातील पिक्‍चर अभी बाकी आहे, या वक्तव्याचा धागा पकडून उद्धव म्हणाले, श्रीनिवास म्हणाला पिक्‍चर अभी बाकी आहे म्हणजे 2019 निवडणुकीचा हिरो तोच असेल. उन्हामुळे जर यंत्रे बंद पडत असतील, तर मग चाचण्या कसल्या घेतल्या? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला. मतदार यादीतील नावे गायब, बोगस मतदान, यंत्रे बिघडली याला लोकशाही म्हणतात? हा सवालही त्यांनी केला.

पैसे वाटताना लोक पकडले. त्यांच्यावर तक्रार करूनही कारवाई झाली नाही. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करूनही श्रीनिवासने त्यांना घाम फ ोडला. एका आदिवासी पोराने 15 दिवसांत अडीच लाख मते मिळवली. आता आठ महिने शिल्लक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे, वाढवण बंदर याला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकारने चालवला आहे. मात्र, शिवसेना भूमीपुत्रांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

सभेला शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोर्‍हे, रवींद्र फाटक, अमित घोडा, पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे, महिला संघटक दीपा पाटील, विशाखा राऊत, केतन पाटील, वसंत चव्हाण, वैभव संख्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

कमळाबाई विचित्र वागल्याने घटस्फाेट : श्रीनिवास वनगा

गेली अनेक वर्षे दिवंगत खासदार चिंतामण वनगा आणि माझ्या परिवाराने कमळाबाईबरोबर संसार केला. मात्र, कमळाबाई विचित्र वागायला लागल्याने आम्हाला नाईलाजाने घटस्फोट घेऊन बाहेर पडावे लागले. आता शिवसेनेचे शिवधनुष्य खांद्यावर घेऊन पुढील वाटचाल करू, असे श्रीनिवास वनगा म्हणाले. यावेळी श्रीनिवास यांची पालघर संघटक म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली.