Sat, Apr 20, 2019 09:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसाठी दोन दिवस धोक्याचे!

मुंबईसाठी दोन दिवस धोक्याचे!

Published On: Dec 05 2017 1:59AM | Last Updated: Dec 05 2017 1:01AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

अरबी समुद्राला दोन दिवस मोठी भरती असल्यामुळे लाटांची उंची साडेपाच मिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस मुंबईसाठी धोक्याचे आहेत. वादळाचा फटका किनार्‍यालगतच्या कोळीवाड्यांना व अन्य वस्त्यांना बसण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी पालिकेने समुद्रालगत विशेष टिम तैनात केल्या आहेत. ओखी वादळाच्या इशार्‍यामुळे पालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी व बुधवारी मध्यरात्री समुद्रात 5 मिटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. वादळामुळे लाटांची उंची साडेपाच मिटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कुलाबासह वरळी, बांद्रा, दादर, खार, सांताक्रूझ, जुहू, चंदन सिनेमा, सातबंगला, वेसावे, गोराई, मढ, मार्वे समुद्र किनार्‍या लगतच्या कोळीवाडे व वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समुद्रातील पाण्याची पातळी नेहमीपेक्षा वाढल्यास, किनार्‍यालगतच्या वस्त्यांनी तातडीने स्थलांतर करावे, अशा सुचनाही पालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. 
या वस्त्यांमधील नागरिकांना सूचना देण्यासाठी पालिकेच्या कुलाबा, ए विभाग, चंदनवाडी सी-विभाग, ग्रॅण्डरोड डी-विभाग, प्रभादेवी जी-दक्षिण, दादर जी-उत्तर, बांद्रा एच-पश्‍चिम, अंधेरी-के पश्‍चिम, मालाड पी-उत्तर, कांदिवली आर-दक्षिण विभाग कार्यालयांना विशेष टिम स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय नेव्ही, कोस्टगार्ड, अग्निशमन दल, पोलीस, पालिकेच्या आपत्कालिन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

आंबेडकर अनुयायांसाठी शाळेत निवासाची सुविधा  भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवार व बुधवारी शिवाजी पार्क चैत्यभूमी येथे आंबेडकर अनुयायांची गर्दी उसळणार आहे. चैत्यभूमी समुद्रालगत असल्यामुळे पालिकेच्या जी-उत्तर विभागाने विशेष यंत्रणा उभारली आहे. समुद्रात कोणीही अनुयायी जाऊ नये, यासाठी किनार्‍याला सूचना फलकासह  कर्मचार्‍यांचीही नियुक्ती केली आहे. वादळामुळे किनार्‍यासह आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे अनुयायांना मैदानात करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासातून पालिका शाळांमध्ये हलवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.