Tue, Jul 16, 2019 00:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणे, अशोक चव्हाण, दर्डांचीही चौकशी सुरू

राणे, अशोक चव्हाण, दर्डांचीही चौकशी सुरू

Published On: Jan 20 2018 2:12AM | Last Updated: Jan 20 2018 2:09AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जमिनी खुल्या केल्याप्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबरच माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण आणि राजेेंद्र दर्डा यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी आता अंतिम टप्प्यात आली असून त्याबाबतचा अहवाल आता लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. 
एमआयडीसीतील जमिनी खुल्या केल्याप्रकरणी विरोधकांनी सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून या जमिनीवरील एमआयडीसीची आरक्षणे उठविण्यात आल्याचा व जमिनीची कमी किमतीत विक्री केल्याने देसाई यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही विधिमंडळात करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याचे निवृत्त अपर मुख्य सचिव केे. पी. बक्षी यांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती. 

त्याबाबत बक्षी यांना विचारले असता, राज्य सरकारने आखून दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे 2002 पासूनच्या प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. जमिनी खुल्या करण्याबाबत ज्या मंत्र्यांच्या काळात निर्णय घेण्यात आले त्यासंबंधित मंत्र्यांकडूनही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. त्यामध्ये तीन माजी उद्योगमंत्र्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष देसाई यांनी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी सुरू आहे. त्यांना म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी आपले स्पष्टीकरणही सादर केले आहे. चौकशी अंतिम टप्प्यात असून येत्या पंधरा ते वीस दिवसांत सरकारला अहवाल सादर केला जाईल, असेही बक्षी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चौकशीतून काय बाहेर येते याबाबत उत्सुकता आहे. सरकारी धोरणानुसार आणि मागील काळात घेण्यात आलेल्या निर्णयानुसारच आपल्या काळात जमिनींबाबत निर्णय घेण्यात आल्याचे देसाई यांनी म्हटल्याचे समजते.